भोर तालुक्यात झेंडूचे फुलले मळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 07:42 PM2018-10-10T19:42:46+5:302018-10-10T19:51:49+5:30
भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील विसगाव, चाळीसगाव खोऱ्यात डोंगरी भागात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची शेती केल्याने नवरात्रोत्सव काळात झेंडूचे मळे फुलले आहेत.
नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिण पट्ट्यातील विसगाव, चाळीसगाव खोऱ्यात डोंगरी भागात अनेक शेतकऱ्यांनी झेंडूची शेती केल्याने नवरात्रोत्सव काळात झेंडूचे मळे फुलले आहेत. यामुळे दसरा व दिवाळी सणासाठी परिसरात झेंडूचा सुगंध दरवळू लागला असून परिसरातील झेंडूची शेती पिवळी धमक दिसत आहे.
विसगाव तसेच चाळीसगाव खोऱ्यातील नेरे, आंबाडे, खानापूर, वरवडी, पळसोशी, बाजारवाडी, गोकवडी, आंबवडे, कर्णावड, करंजे, निळकंठ परिसरातील शेतकऱ्यांनी आगामी दसरा व दिवाळी सणाच्या काळात फुले तोडणीस येतील. या नियोजनाने झेंडूची लागवड करण्यात आली होती. या परिसरात अष्टगंधा, कलकत्ता, गोल्डस्पॉट या जातीचा झेंडू मोठ्या प्रमाणावर उत्पादित केला जातो. सणांच्या काळात झेंडूला विशेष मागणी असल्याने सध्या ५० ते ६० रुपये किलोला भाव आहे. पुढील काळात १०० ते १२० रुपये किलोला भाव मिळेल अशी तालुक्यातील शेतकऱ्यांना आशा आहे. मागील महिन्यात झेंडूला बाजारभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. मात्र बुधवारपासून नवरात्रोत्सव सुरु झाल्याने बाजारभावात वाढ झाली आहे. यामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.
झेंडू उत्पादकांना देवी पावेल
नवरात्रोत्सव काळात अवकाळी पाऊस बरसला नाही तर तालुक्यातील फुललेले झेंडूचे मळे वाया जाणार नाहीत. उत्पन्नात वाढ होईल व असणारा किलोचा 60 ते 70 रुपयांचा बाजारभाव टिकून राहील. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना देवी पावेल असे वाटत असल्याचे करंजे (ता. भोर) येथील झेंडू उत्पादक शेतकरी विजय कुडले यांच्याकडून सांगण्यात आले.