अकरावीच्या ३० हजार जागा रिक्त, ३२ महाविद्यालयांत शून्य प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 03:03 AM2018-11-06T03:03:28+5:302018-11-06T03:03:44+5:30
अकरावीसाठी ३२ महाविद्यालयांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्याने तिथल्या सर्व जागा रिक्त राहिल्या आहेत.
पुणे - अकरावीसाठी ३२ महाविद्यालयांमध्ये एकाही विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्याने तिथल्या सर्व जागा रिक्त राहिल्या आहेत. सर्व महाविद्यालयांमधील एकूण ३० हजार ७४३ जागा रिक्त राहिल्या असून विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १५ हजार ७२१ जागांचा समावेश आहे.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून आकडेवारी जाहीर करण्यात आली. एकूण ६६ हजार ६९२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. ८१८ महाविद्यालयांमधील ९७ हजार ४३५ जागा उपलब्ध होत्या. ५२ हजार ५८० विद्यार्थ्यांचे प्रवेश आॅनलाइन प्रवेश फेरीतून (कॅप) झाले, तर १४ हजार ११२ कोट्यांतर्गत प्रवेश झाले.
शहरातील ३२ अनुदानित महाविद्यालयांमध्ये एकही प्रवेश झाला नाही. तिथे २ हजार १५० जागा होत्या. ८१८ महाविद्यालयांपैकी १६० महाविद्यालयांमधील २० हजार ११५ जागा भरल्या गेल्या आहेत. १६५ महाविद्यालयांमध्ये २० पेक्षाही कमी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १५ हजार ७२१ जागा रिक्त राहिल्या. कला शाखेच्या ६ हजार ०५३, वाणिज्य शाखेच्या ७ हजार ३७६, तर एमसीव्हीसीच्या १५९३ जागा रिक्त राहिल्या आहेत. कला शाखेच्या मराठी माध्यमाच्या २ हजार १४, तर इंग्रजी माध्यमाच्या ४ हजार ०३९ जागा शिल्लक राहिल्या आहेत.
कला शाखेत
सर्वात कमी प्रवेश
पारंपरिक शिक्षणामध्ये कला शाखेत प्रवेश घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमधून कला शाखेमध्ये केवळ ७ हजार ९०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. सर्वाधिक ३१ हजार ५६९ प्रवेश वाणिज्य शाखेमध्ये झाले आहेत. त्यापाठोपाठ विज्ञान शाखेत २४ हजार ०८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.
कोट्यातून १४ हजार ११२ प्रवेश
अल्पसंख्याक महाविद्यालयांतील जागा त्यांच्या स्तरावर भरण्याचे निर्देश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले होते. त्यानुसार कोट्यांतर्गत १४ हजार ११२ प्रवेश देण्यात आले आहेत. कॅप फेरीअंतर्गत ५२ हजार ५८० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. एकूण ६६ हजार ६९२ विद्यार्थ्यांनी अकरावीसाठी प्रवेश घेतला.