अभ्यास करून परीक्षा देऊन 'शून्य' गुण; विद्यार्थ्यांचा संताप, विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 06:46 PM2022-09-13T18:46:52+5:302022-09-13T18:47:15+5:30
परीक्षा व्यवस्थित देऊनही इतक्या माेठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास हाेणे ही परीक्षा विभागाची चूक
कमलाकर शेटे
पुणे : यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एप्रिल महिन्यात घेतलेल्या एलएलबी व बीएएलएलबी परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून, त्यामध्ये अनेक विद्यार्थी नापास झाले आहेत. परीक्षा व्यवस्थित देऊनही इतक्या माेठ्या प्रमाणावर विद्यार्थी नापास हाेणे ही परीक्षा विभागाची चूक आहे. ती चूक तातडीने दुरूस्ती करून निकाल पुन्हा लावावेत, अशी मागणी अहमदनगरच्या न्यू लॉ कॉलेज, पिंपरीच्या डाॅ. डी. वाय. पाटील व इतर संलग्न विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी साेमवारी परीक्षा विभागाला दिले.
पेपर योग्य पद्धतीने लिहूनही काही विषयांमध्ये बहुतांश विद्यार्थी नापास झाले आहेत. यात खासकरून लँड लाॅ-२मध्ये सर्वाधिक व त्याखालोखाल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लाॅ व कंपनी लाॅ या विषयांचा समावेश आहे. बहुतांश विद्यार्थ्यांना १५ पेक्षाही कमी गुण मिळाले आहेत. एकवेळ कमी गुणांचे समजू शकताे. परंतु, पुरवणी लावून परीक्षा देऊनही शून्य गुण कसे पडले, असा सवाल या विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. पेपर पूर्णपणे व व्यवस्थित पद्धतीने लिहूनही चूक नसताना नापास झालेल्या या विद्यार्थ्यांच्या निकालांबाबत विद्यापीठाकडून चौकशी व्हावी व नक्की कुठल्या कारणास्तव विद्यार्थी नापास झाले आहेत, याचा खुलासा करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. पेपर तपासणी नीट न झाल्याने किंवा टायपिंग मिस्टेक झाली आहे का, याचा तपास व्हावा. तसेच येत्या ७ दिवसात या प्रकरणाची चाैकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
''एलएलबीच्या निकालामध्ये लॅन्ड लॉ-२ या विषयात बहुतांश विद्यार्थी नापास झाले आहेत. तसेच बीएएलएलबीमध्ये ॲडमिनिस्ट्रेशन लॉ, कंपनी लॉ आणि लॅन्ड लॉ-२ या तिन्हीही विषयात नापास आहेत. अनेक महाविद्यालयात असा प्रकार झालेला आहे. पुनर्मूल्यांकन, पुनर्तपासणी किंवा पुनर्तपासणी करायला सांगितले जाते. परंतु यासाठी आम्ही तयार नाहीत. कारण यामध्ये पूर्णपणे चूक तपासणीची किंवा गुण देण्यामध्ये झालेली आहे. याचा भुर्दंड विद्यार्थ्यांना बसू नये. - सीमा दरेकर, विद्यार्थिनी एल. एल. बी., न्यू लॉ कॉलेज, अहमदनगर''
''परीक्षा विभागाने जाहीर केलेल्या निकालामध्ये काेविड पूर्वच्या काळाच्या निकालाच्या तुलनेत आता संयुक्त उत्तीर्णता अर्थात कम्बाइन पासिंगमुळे ६६ टक्के व ८५ टक्के अशी वाढ झाल्याचे दिसून येते. यामुळे निकालामध्ये सध्या कोणताही बदल झालेला वाटत नाही. निकालाची टक्केवारी ही निश्चितपणाने समाधानकारक असल्याने पुनर्परीक्षेचा प्रश्न येत नाही. काही विषयांमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे व शून्य गुण मिळण्याचे प्रमाण अधिक असल्याने पुनर्मूल्यांकन करून घेण्याबाबत परीक्षा विभाग सकारात्मक आहे. - डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ''