राज्यात झीरो पेंडेन्सी राबविणार, एक कोटीहून अधिक फायलींचा निपटारा - मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:07 AM2017-10-08T03:07:18+5:302017-10-08T03:07:32+5:30
पुणे महसूल विभागात गेल्या तीन महिन्यांत ‘झीरो पेंडन्सी’च्या माध्यमातून एक कोटींहून अधिक फायलींचा निपटारा झाला आहे. यापुढे संपूर्ण राज्यभरात झीरो पेंडन्सी राबवणार असून त्यासंदर्भातील शासननिर्णय लवकरच काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
पुणे : पुणे महसूल विभागात गेल्या तीन महिन्यांत ‘झीरो पेंडन्सी’च्या माध्यमातून एक कोटींहून अधिक फायलींचा निपटारा झाला आहे. यापुढे संपूर्ण राज्यभरात झीरो पेंडन्सी राबवणार असून त्यासंदर्भातील शासननिर्णय लवकरच काढला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केली.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अद्ययावत पाच मजली पर्यावरणपूरक इमारतीचे उद्घाटन फडणवीस यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री चंद्र्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर मुक्ता टिळक, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव आदी उपस्थित होते.
नव्या वास्तूत जाणे प्रगतीचे लक्षण आहे. मात्र, कामाची गती वाढणेही गरजेचे आहे, असे सांगून फडणवीस म्हणाले, सेवा हमी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी बांधील आहोत. त्यामुळे प्रशासकीय कामाची गती वाढली पाहिजे. सरकारी कार्यालयांमध्ये व्यवस्थेबरोबरच आस्था असली पाहिजे. झीरो पेंडन्सीबाबत संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण देऊन सर्व विभागांमध्ये स्पर्धा घेऊन प्रोत्साहन दिले जाणार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत ही भूकंपरोधक आहे, याचा उल्लेख करुन केवळ शासकीय इमारती भूकंपरोधक ठेवू नये तर प्रशासन सुध्दा भ्रष्टाचारमुक्त ठेवावे. राजकीय पक्षांपुढे विश्वासार्हता सिद्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. प्रशासकीय व्यवस्थेलासुद्धा आपली विश्वासार्हता दाखवावी लागेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.