पुण्यात सावलीच गायब; नागरिकांनी अनुभवला Zero Shadow Day
By श्रीकिशन काळे | Published: May 13, 2023 02:17 PM2023-05-13T14:17:35+5:302023-05-13T14:18:43+5:30
पुणेकरांनी टेरेसवर, रस्त्यावर येऊन आपली सावली गायब होत असल्याने पाहिले आणि फोटोही काढले
पुणे : दररोज दिवसा आपण फिरताना आपली सावली सोबत असते. पण जर ही सावलीच गायब झाली तर...हाच अनुभव आज दुपारी साडेबारा वाजता पुणेकरांना घेता आला. दरवर्षी वर्षातून दोनदा सावली गायब होते. त्या दिवसाला ‘झिरो शॅडो डे’ असे म्हटले जाते.
सावली गायब हाेणार असल्याने अनेकांनी हा प्रयोग पाहिला. लहान मुलांनी उन्हात उभे राहून सावली गायब झाल्याचा अनुभव घेतला. सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन या भौगोलिक कारणामुळे पुण्यात आज (दि.१३) 'झीरो शॅडो डे' पहायला मिळाला. दुसरा डे हा जुलै महिन्यामध्ये असतो. परंतु, तेव्हा पाऊस असल्याने ढगाळ वातावरणामुळे तो नीट पाहता येत नाही.
पुणेकरांनी टेरेसवर, रस्त्यावर येऊन आपली सावली गायब होत असल्याने पाहिले आणि फोटोही काढले. १३ मे रोजी पुण्याचे अक्षांश १८.५ अंश असल्याने सूर्य उत्तरेला प्रवास करताना या दिवशी तो डोक्यावर येतो. डोक्यावर आल्याने सावली पडत नाही. पुणेकरांना बारा वाजून ३६ मिनिटांनी सावली दिसली नाही. हा अनुभव १ वाजेपर्यंत पहायला मिळाला. लहान मुलांसाठी हा अनुभव गंमतीशीर होता.