Zika Virus: पुण्याच्या एरंडवणेत झिकाचा उद्रेक; आणखी एका गर्भवतीला लागण, रुग्णसंख्या सहा वर
By ज्ञानेश्वर भोंडे | Published: July 1, 2024 04:49 PM2024-07-01T16:49:08+5:302024-07-01T16:49:21+5:30
गर्भवती महिलांना संसर्ग हाेणे हे त्यांच्या बाळांसाठी अधिक धाेक्याचे समजले जाते
पुणे : पुण्यात एरंडवणे येथील आणखी एका ३५ वर्षीय वर्षाच्या गर्भवतीला झिकाची लागण झाली आहे. तिचा अहवाल साेमवारी पाॅझिटिव्ह आला. शहरातील एकूण झिका पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ६ झाली आहे. त्यापैकी दाेन महिला गर्भवती आहेत. तर एकटया एरंडवणेतील रुग्णांची संख्या ४ झाली आहे.
ही गर्भवती महिला एरंडवणेतील गणेशनगर येथील रहिवाशी असून ती १६ आठवडयांची गर्भवती आहे. या महिलेला संसर्ग झाल्याने तिच्या बाळामध्ये विकृती निर्माण हाेण्याची शक्यता वाढली आहे, तसेच, पालखीच्या पार्शवभूमीवर शहरात झिका संसर्ग वाढण्याचा धाेकाही निर्माण झाला आहे.
महापालिकेच्या हद्दीत एरंडवणेत २१ जून राेजी दाेन झिकाचे रुग्ण सापडले. यामध्ये ४६ वर्षांचा डाॅक्टर आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला झिकाचे निदान झाले. त्यानंतर मुंढवा येथे ४७ वर्षांची एक महिला आणि तिच्या २२ वर्षांच्या मुलालाही झिकाचे निदान झाले. एरंडवणेतील गणेशनगर येथील २८ वर्षीय गर्भवतीला लागण झाली आहे. आता त्यामध्ये आणखी एका रुग्णाची भर पडली आहे.
झिका जीवघेणा आजार नाही. ताप, डाेकेदुखी, अंगावर पुरळ, सांधेदुखी अशी लक्षणे दिसून येतात आणि उपचारांनी ती जातात. परंतु, त्याचा खरा धाेका गर्भवती महिलांच्या बाळांना आहे. गर्भवतीला लागण झाल्यास तिच्या बाळामध्ये मायक्राेसेफेली म्हणजेच त्याच्या डाेक्याचा घेर हा नेहमीच्या तुलनेत छाेटा हाेऊ शकताे. तसेच, इतर विकृतीही निर्माण हाेऊ शकतात.
महापालिकेचे प्रयत्न अपुरे?
झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेच्या आराेग्य विभागाने ताप रुग्ण सर्वेक्षण, गर्भवती महिला सर्वेक्षण, डासांचे सर्वेक्षण व इतर उपाययाेजना केल्याचे सांगितले मात्र, तरीही झिकाचा संसर्ग काही आटाेक्यात येताना दिसत नाही. त्यातच गर्भवती महिलांना संसर्ग हाेणे हे त्यांच्या बाळांसाठी अधिक धाेक्याचे समजले जाते.