Zika Virus: पुण्यात वाढताेय झिकाचा धाेका; २ गर्भवतींसह आतापर्यंत ७ रुग्ण, कम्युनिटीमध्ये संसर्ग झाल्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 03:32 PM2024-07-03T15:32:44+5:302024-07-03T15:33:00+5:30
झिकाचा संसर्ग आटाेक्यात आणण्यास आराेग्य यंत्रणेला अपयश आले असून, पहिल्या रुग्णाला संसर्ग काेठून झाला, याचा धागादाेरा सापडत नाही
पुणे : पुण्यात झिकाचा संसर्ग वाढत आहे. एरंडवणे येथील दाेन गर्भवतींना आणि काेथरूडच्या डहाणूकर काॅलनीमध्येही एकाला झिकाची लागण झाली आहे. शहरातील एकूण झिका पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ७ वर पाेहाेचली आहे.
झिकाचा संसर्ग आटाेक्यात आणण्यास आराेग्य यंत्रणेला अपयश आले असून, पहिल्या रुग्णाला संसर्ग काेठून झाला, याचा धागादाेरा सापडत नाही. त्यामुळे कम्युनिटीमध्ये झिकाचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महापालिका हद्दीत एरंडवणे येथे २१ जून राेजी झिकाचे दाेन रुग्ण सापडले. यामध्ये ४६ वर्षांचा डाॅक्टर आणि त्याच्या १५ वर्षांच्या मुलीला झिकाचे निदान झाले. त्यानंतर मुंढवा येथे ४७ वर्षांची एक महिला आणि तिच्या २२ वर्षांच्या मुलालाही झिकाचे निदान झाले. एरंडवणे येथील गणेशनगरमध्ये २८ वर्षीय आणि ३५ वर्षीय गर्भवतींना झिकाची लागण झाली आहे. आता पुन्हा डहाणूकर काॅलनी येथे एक नवीन रुग्ण आढळून आल्याने संसर्ग वाढत चालल्याचे दिसते.
कसा हाेताे संसर्ग?
झिका व्हायरस हा एडिस इजिप्ती डासांच्या माध्यमातून पसरताे. प्रामुख्याने झिकाचा संसर्ग हाेण्याचे हे मुख्य कारण आहे. हा डास दिवसाही चावताे. त्याबराेबरच लैंगिक संबंध किंवा प्रसूतीदरम्यान संक्रमित आईकडून गर्भातील बाळालाही ताे हाेताे. एरंडवणे येथून हा संसर्ग इतरांनाही झाल्याने याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहेत लक्षणे?
- झिका हा तसा जीवघेणा आजार नाही. झिका विषाणूचा संसर्ग असलेल्या बहुतेक लोकांमध्ये सुरुवातीला लक्षणे आढळून येत नाहीत. नंतर पुरळ येणे, ताप, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळून येतात. जी २ ते ७ दिवस टिकतात.
- झिका विषाणूच्या तपासणीसाठी रक्त किंवा लघवीची आरटी पीसीआर चाचणी केली जाते. व्यक्ती आजारी पडल्यानंतर ही चाचणी एक आठवड्याच्या आत केली तर अचूक निदान करण्यास मदत होते. आजारी पडल्याच्या एका आठवड्यानंतर झिका विषाणूची तपासणी केली, तर ही चाचणी पद्धत फार प्रभावी ठरू शकत नाही.
गर्भवतींना धाेका काय?
गर्भवतीला झिका विषाणूचा संसर्ग झाल्यास बाळाला मायक्राेसेफेली म्हणजे बाळाचा डोके आकाराने लहान हाेऊ शकते. गर्भाच्या मेंदूच्या विकासावर थेट परिणाम करू शकतो. मायक्रोसेफली व्यतिरिक्त इतर जन्मदोष, जसे की डोळ्यांसंबंधी दाेष, श्रवणदोष आणि विकासात्मक अडथळे निर्माण होतात. या दोषांमुळे प्रभावित बाळाच्या आरोग्यावर आणि त्याच्या विकासावर परिणाम होऊ शकतात. आतापर्यंत या व्हायरसवर ना कोणती लस आली नाही.
आराेग्य विभागाचे प्रयत्न अपुरे
झिकाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर महापालिकेच्या आराेग्य विभागाने ताप रुग्ण सर्वेक्षण, गर्भवती महिला सर्वेक्षण, डासांचे सर्वेक्षण व इतर उपाययाेजना केल्याचे सांगितले; तरीही संसर्ग काही आटाेक्यात येताना दिसत नाही. सध्या राज्याची आणि महापालिका आराेग्य यंत्रणा ही पालखी नियाेजनात गुंतल्याने त्याचा परिणाम हाेताना दिसून येत आहे.
काय आहे प्रतिबंध?
- डास चावणे टाळणे. त्यामध्ये मॉस्किटो रिपेलेंट्स वापरावेत.
- लांब बाह्यांचे कपडे वापरणे, घराच्या परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घेणे.
- वातानुकूलित वातावरणात किंवा डास प्रवेश करू शकणार नाहीत अशा ठिकाणी राहणे.
- गर्भवती स्त्रिया किंवा प्लॅनिंग करणाऱ्या स्त्रियांनी सक्रिय झिका संक्रमित भागात जाणे टाळणे.
गर्भवती महिलेला झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यास न्यूरल ट्यूब डिफेक्ट, मेंदूचा योग्य विकास न होणे, सेरेब्रेल पाल्सी अशा अनेक समस्या निर्माण हाेऊ शकतात. गर्भवतीला संसर्ग झाल्यास या स्थितीमध्ये मुलाचं डोकं लहान किंवा चपटं असतं. यासोबतच डोळे कमकुवत होतात. बाळाला सांधेदुखीची समस्या आणि मेंदूत न्यूरॉक्सची कमतरता आणि हायपरटोनियाची समस्या जाणवू लागतात. - डॉ. प्रसाद कुलट, स्त्रीराेगतज्ज्ञ
झिकाचा प्रसार हा डासांद्वारे हाेत असल्याने त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फवारणी, डासअळीनाशक औषधे यांचा वापर करत उपाययाेजना केल्या जात आहेत. जर काेणाला झिकाची लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी महापालिकेला कळवावे. - डाॅ. कल्पना बळीवंत, प्रभारी आराेग्यप्रमुख, पुणे मनपा