झिका संशयितांचे अहवाल निगेटीव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:15 AM2021-08-14T04:15:16+5:302021-08-14T04:15:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : झिका बाधीत आढळल्यानंतर बेलसर आणि पाच किमी अंतरातील गावात इतर बाधित रूग्ण शोधण्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : झिका बाधीत आढळल्यानंतर बेलसर आणि पाच किमी अंतरातील गावात इतर बाधित रूग्ण शोधण्यासाठी आरोग्य विभागातर्फे धडक सर्वेक्षण मोहिम राबविण्यात येत असून गावांची कसून तपासणी केली जात आहे. आतापर्यंत या तपासणी मोहिमेत १८० पैकी १७४ जणांचे अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. इतर पाच जणांचे अहवाल येणे बाकी आहेत. या तपासणीत १५ जण हे झिका संशयित आढळले होते. त्यांचे देखील अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी दिली.
बेलसरमध्ये झिकाचा रुग्ण आढळल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी तळ ठोकून होते. गावात विविध उपयायोजना केल्या. या शिवाय केंद्राची टीम देखील बेलसर गावाला भेट देण्यास आली होती. त्यांनी केलेल्या विविध सूचनांनुसार बेलसर परिसरातील पाच किलोमीटरच्या परिसरामध्ये झिका संशियत रुग्णांची कसून तपासणी करण्यात आली. आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात ९ हजार ५०६ घरांची तपासणी करून ३६ हजार ५४३ जणांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये पंधरा जण झिकाचे संशयित आढळले होते. या गावामध्ये डास उत्पत्ती होत असलेली जवळपास ११६ ठिकाणी आढळली होती. ती आरोग्य विभागाकडून नष्ट करण्यात आली आहेत. घरांच्या तपासणीमध्ये १ हजार १३९ कंटनेरमध्ये डासांच्या जिवंत अळ्या सापडल्या होत्या.
चौकट
जुलै महिना अखेरीला राज्यात पुणे जिल्ह्यात झिकाचा पहिला रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग खडबडून जागे झाले. आणखी रुग्णांच्या भितीमुळे बेलसर सह पाच किमी परिसरातील गावात तपासणी मोहिम हाती घेण्यात आली. परंतु आत्तापर्यंत पुन्हा झिकाचे रुग्ण आढळलेले नाहीत. आरोग्य विभागाकडून गावामध्ये २८ वेळा धुर फवारणी तर ११ वेळा फवारणी करण्यात आली आहे. तसेच डास उत्पत्तीचे ठिकाणेही नष्ट करण्यात आली आहे.