Zika Virus: राज्यात झिकाचा संसर्ग वाढतोय; पुण्यात सर्वाधिक रुग्ण, आरोग्य यंत्रणा चिंतेत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 03:50 PM2024-08-09T15:50:33+5:302024-08-09T15:51:34+5:30
झिकाच्या रुग्णांना पुरळ येणे, ताप, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळून येतात
पुणे: राज्याबरोबरच पुण्यातही झिकाचा (Zika Virus) संसर्ग वाढताना दिसत आहे. झिकाचा संसर्ग आटाेक्यात आणण्यास आराेग्य यंत्रणेला अपयश आले असून पुणे शहरात आतापर्यंत सर्वाधिक 66 रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात आत्तापर्यंत एकूण ८० रुग्णांना झिकाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. पुण्यात झिकाचा संसर्ग वाढत आहे. झिका व्हायरस हा एडिस इजिप्ती डासांच्या माध्यमातून पसरताे. प्रामुख्याने झिकाचा संसर्ग हाेण्याचे हे मुख्य कारण आहे. हा डास दिवसाही चावताे. त्याबराेबरच लैंगिक संबंध किंवा प्रसूतीदरम्यान संक्रमित आईकडून गर्भातील बाळालाही ताे हाेताे.
काय आहेत लक्षणे?
- झिका हा तसा जीवघेणा आजार नाही. झिका विषाणूचा संसर्ग असलेल्या बहुतेक लोकांमध्ये सुरुवातीला लक्षणे आढळून येत नाहीत. नंतर पुरळ येणे, ताप, डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळून येतात. जी २ ते ७ दिवस टिकतात.
- झिका विषाणूच्या तपासणीसाठी रक्त किंवा लघवीची आरटी पीसीआर चाचणी केली जाते. व्यक्ती आजारी पडल्यानंतर ही चाचणी एक आठवड्याच्या आत केली तर अचूक निदान करण्यास मदत होते. आजारी पडल्याच्या एका आठवड्यानंतर झिका विषाणूची तपासणी केली, तर ही चाचणी पद्धत फार प्रभावी ठरू शकत नाही.
गर्भवतींना धाेका काय?
गर्भवतीला झिका विषाणूचा संसर्ग झाल्यास बाळाला मायक्राेसेफेली म्हणजे बाळाचा डोके आकाराने लहान हाेऊ शकते. गर्भाच्या मेंदूच्या विकासावर थेट परिणाम करू शकतो. मायक्रोसेफली व्यतिरिक्त इतर जन्मदोष, जसे की डोळ्यांसंबंधी दाेष, श्रवणदोष आणि विकासात्मक अडथळे निर्माण होतात. या दोषांमुळे प्रभावित बाळाच्या आरोग्यावर आणि त्याच्या विकासावर परिणाम होऊ शकतात. आतापर्यंत या व्हायरसवर ना कोणती लस आली नाही.
काय आहे प्रतिबंध?
- डास चावणे टाळणे. त्यामध्ये मॉस्किटो रिपेलेंट्स वापरावेत.
- लांब बाह्यांचे कपडे वापरणे, घराच्या परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घेणे.
- वातानुकूलित वातावरणात किंवा डास प्रवेश करू शकणार नाहीत अशा ठिकाणी राहणे.
- गर्भवती स्त्रिया किंवा प्लॅनिंग करणाऱ्या स्त्रियांनी सक्रिय झिका संक्रमित भागात जाणे टाळणे.