जिल्हा परिषद निवडणुकांसाठी पक्ष लागले कामाला
By admin | Published: January 10, 2017 02:51 AM2017-01-10T02:51:28+5:302017-01-10T02:51:28+5:30
महापालिका पाठोपाठ सर्व राजकीय पक्ष आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. उमेदवारांच्या मुलाखती घेणे
पुणे: महापालिका पाठोपाठ सर्व राजकीय पक्ष आता जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. उमेदवारांच्या मुलाखती घेणे, आरक्षित जागांवर उमेदवारांचा शोध घेणे, मतदार संघनिहाय उमेदवार निश्चित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षाची धावपळ सुरु आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यात आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांची उमेदवारी निवडीसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. निवडणुकीची रणधुमाळी आता लवकरच सुरू होणार आहे. सर्वच पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहे.
जिल्हात काँगे्रस आणि राष्ट्रवादी काँगे्रसकडून उमेदवारांच्या मुलाखतीचे फड मंगळवार (दि.१०) पासून सुरु होत आहेत.
यामध्ये सध्या जिल्हा परिषदेत सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने ७५ जिल्हा परिषद गट व १५० पंचायत समिती गणांसाठी १० व ११ जानेवारी दरम्यान पुण्यातील मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात तालुकानिहाय मुलाखती घेण्यात येणार आहेत.
पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासह सर्व प्रमुख नेते मुलाखतीसाठी उपस्थित राहणार आहेत. काँगे्रसच्या वतीने प्रत्येक गट व गणनिहाय उमेदवारी अर्ज मागविले असून, उमेदवारांच्या मुलाखती तालुकास्तरावरच घेण्यात येणार आहे. दरम्यान राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीला मावळ व शिरुर तालुका सोडल्यास अन्य सर्व तालुक्यांमध्ये उमेदवारांचा शोध घ्यावा लागत असून, इतर पक्षातील कोणी तगडा उमेदवार गळाला लागतोय का या शोधात सध्या भाजप आहे.
जिल्ह्यात काही तालुक्यामध्ये भाजपला उमेदवार मिळतील का याबाबत देखील शंका आहे. शिवसेनेकडून इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात येत आहेत.
राष्ट्रवादी यादी लवकरच जाहीर करणार
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँगे्रसच्या वतीने मंगळावर (दि.१०) पासून सकाळी ९ वाजल्या पासून मार्केट यार्ड येथील निसर्ग मंगल कार्यालयात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात सुरुवात होणार आहे. यामध्ये पक्षाचे नेते अजित पवार, दिलपी वळसे पाटील, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीपक यांच्यासह आजी-माजी आमदार, पदाधिकारी उपस्थित राहणार आहे. पहिल्या दिवशी हवेली, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा आणि पुरंदर तालुक्यातील इच्छुकांच्या मुलाखती तर बुधवार (दि.११) रोजी हवेली, जुन्नर, मावळ, शिरुर, आंबेगाव, खेड आणि मुळशी तालुक्यातील उमेदवारांच्या मुलखती घेण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसकडे सर्व जागांवर तुल्यबळ उमेदवार असून, जिल्ह्यात सर्वांत पहिले उमेदवाराची यादी पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात येईल.
- जालिंदर कामठे,
राष्ट्रवादी काँगे्रस जिल्हाध्यक्ष
काँगे्रस सर्व जागा लढविणार
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसच्या वतीने तयारी सुरु केली असून, इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. उमेदवारांच्या मुलाखती तालुकास्तरावरच पक्षाचे नेते व पदाधिका-यांच्या उपस्थित घेण्यात येणार आहे. यावेळी पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा सर्व शक्तीने लढविण्यात येणार आहेत.
- संजय जगताप, काँगे्रस जिल्हाध्यक्ष