जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी सुरू
By admin | Published: March 19, 2017 03:56 AM2017-03-19T03:56:46+5:302017-03-19T03:56:46+5:30
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी येत्या मंगळवारी (दि. २१) निवडणूक होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पद आपल्याला मिळावे, यासाठी उमेदवारांनी जोरदार
पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी येत्या मंगळवारी (दि. २१) निवडणूक होत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष पद आपल्याला मिळावे, यासाठी उमेदवारांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. तर, आपल्या तालुक्यात व आपल्या समर्थकांना ही पदे मिळावीत, यासाठी तालुक्यातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत ७५ जागांपैकी ४४ जागा मिळून राष्ट्रवादी काँगे्रसने एकहाती सत्ता मिळविली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी, विविध समित्यांच्या ४ सभापतिपदी राष्ट्रवादी काँगे्रसचेच सदस्य निवडून येणार, हे निश्चित आहे. यामध्ये येत्या मंगळवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांची निवडणूक होऊन नवीन सभागृह अस्तित्वात येईल. त्यानंतर सभापती पदांसाठी निवडणूक होईल. राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अजित पवार यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेताना ज्या तालुक्यात पक्षाचे सर्वांधिक उमेदवार निवडून येतील, त्यांनाच अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य पदे देण्यात येतील, असे स्पष्ट केले होते. पवार यांच्या या निकषानुसार अध्यक्षपदावर खऱ्या अर्थांने बारामती तालुक्याचा दावा असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुढील अडीच वर्षांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी (ओबीसी) आरक्षित आहे.
अध्यक्षपदाची माळ यंदा जुन्नर अथवा बारामती तालुक्याच्या गळ्यात पडण्याची शक्यता आहे. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांचे समर्थक जुन्नर तालुक्यातील राजुरी-बेल्हा गटातून निवडून आलेले पांडुरंग पवार यांचे नाव आघाडीवर आहे. निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच वळसे-पाटील यांनी अध्यक्षपदासाठी पवार यांच्या नावाची घोषणा केली होती. पवार यापूर्वी दोन वेळा जिल्हा परिषदेवर निवडून आले असून, उपाध्यक्ष म्हणून कामदेखील केले आहे. परंतु, गटनेतेपद जुन्नर तालुक्यातच शरद लेंडे यांना दिल्याने पुन्हा अध्यक्षपद मिळणार का, हा प्रश्नच आहे. त्यानंतर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर-मोरगाव गटातून निवडून आलेले विश्वास देवकाते यांच्या नावाचीदेखील अध्यक्षपदासाठी चर्चा आहे. परंतु, देवकाते यांच्या उमेदवारीपासूनच तालुक्यात त्यांना विरोध झाला. तालुक्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते सतीश खोमणे यांच्यासह अनेकांचा देवकाते यांना अध्यक्षपद देण्यास विरोध होऊ शकतो. दरम्यान, पवार घराण्यातील रोहित पवार यांना अध्यक्षपद द्यावे, अशी तालुक्यातील सर्व सदस्यांची मागणी आहे. परंतु, घराणेशाहीचे आरोप होत असताना पवार यांना अध्यक्षपद देणार का, याबाबत उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)
- इंदापूर तालुक्यातील वैशाली पाटील यांच्या नावाचीदेखील अध्यक्षपदासाठी चर्चा आहे; परंतु आमदार दत्तात्रय भरणे याबाबत काय भूमिका घेतात, यावर त्यांचे भवितव्य अवलंबून आहे. दौंड तालुक्यातील दुसऱ्यांदा निवडून आलेल्या राणी शेळके उपाध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. याशिवाय, आंबेगाव तालुक्यातील दिलीप वळसे-पाटील यांचे पुतणे विवेक वळसे-पाटील यांनादेखील उपाध्यक्ष अथवा एखादे सभापती पद दिली जाण्याची
शक्यता आहे.
- शिरूर तालुक्यातील माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी सुजाता पवार व सुनीता गावडे यांना एखादे पद मिळू शकते. तर, अनुभवी सदस्य म्हणून इंदापूर तालुक्यातील वीरधवल जगदाळे, भोर तालुक्यातील रणजित शिवतरे यांच्या नावाचादेखील विचार होऊ शकतो. त्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष पद मिळण्यासाठी सर्वच इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दरम्यान, पक्षाचे नेते अजित पवार नव्याने निवडून आलेल्या एखाद्या नवख्या सदस्यालादेखील पद देऊ शकतात.