जिल्हा परिषद सभापतींची आज निवड!
By admin | Published: July 13, 2016 01:55 AM2016-07-13T01:55:16+5:302016-07-13T01:55:16+5:30
अकोला जिल्हा परिषदेच्या कोणकोणत्या सदस्यांची सभापतिपदांवर वर्णी लागणार, याबाबत जिल्हावासीयांची उत्सुकता शिगेला.
अकोला: पुढील अडीच वर्षांंच्या कालावधीसाठी जिल्हा परिषदेच्या नवीन चार सभापतींची निवड बुधवारी करण्यात येणार आहे. या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या कोणकोणत्या सदस्यांची सभापतिपदांवर वर्णी लागणार, याबाबत जिल्हावासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर महाआघाडीची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू असून, त्यामध्ये शिवसेना-भाजपच्या स्थानिक नेत्यांसह जिल्हा परिषद सदस्यांची बैठक मंगळवारी घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या नवीन अध्यक्ष व उपाध्यक्षपदांची निवड गत ३0 जून रोजी करण्यात आली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या विद्यमान सभापतींचा अडीच वर्षांंचा कालावधी संपत असल्याने, पुढील अडीच वर्षांंच्या कालावधीसाठी जिल्हा परिषदेच्या चार नवीन सभापतींची निवड करण्याकरिता १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेची विशेष सभा बोलविण्यात आली आहे. या विशेष सभेत समाजकल्याण, महिला व बालकल्याण सभापतींसह इतर दोन विषय समिती सभापती, अशा एकूण चार सभापतिपदांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. गत ३0 जून रोजी झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भारिप बहुजन महासंघाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेना-भाजपसह काँग्रेस मिळून महाआघाडीने कंबर कसली होती; परंतु महाआघाडीचा पराभव करीत, दोन्ही पदांच्या निवडणुकीत विजय प्राप्त करीत भारिप-बमसंने जिल्हा परिषदेतील आपले वर्चस्व सिद्ध केले होते. सभापतिपदांच्या निवडणुकीत कोणकोणत्या सदस्यांची वर्णी लागणार, याबाबत जिल्हावासीयांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.