जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवणार
By admin | Published: July 12, 2016 01:51 AM2016-07-12T01:51:41+5:302016-07-12T01:51:41+5:30
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कुणी बरोबर आले तर त्यांच्यासह, आले नाहीत तर त्यांच्याशिवाय निवडणुका लढवल्या जातील
इंदापूर : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय भाजपाच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे. कुणी बरोबर आले तर त्यांच्यासह, आले नाहीत तर त्यांच्याशिवाय निवडणुका लढवल्या जातील. त्याची तयारीही जोरदार सुरू झाली आहे, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे यांनी आज (दि. ११) पत्रकार परिषदेत दिली.
बापट म्हणाले की, पुढच्या कालावधीत ७५ जिल्हा परिषद गट व १५० गणांच्या निवडणुका होणार आहेत. १० नगर परिषदांच्या निवडणुका होत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीसह सर्व ठिकाणच्या नगराध्यक्षपदांच्या निवडणुका लढवण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार आहे. या संदर्भात दौंड व इंदापूर भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी आजचा दौरा आयोजित केला होता. कार्यकर्त्यांचा निर्धार पक्का आहे हे या भेटीमध्ये स्पष्टपणे जाणवले, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. राज्य व केंद्र शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम पक्ष संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केले तर त्या योजना यशस्वी होतील. कार्यकर्ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचतील. या संदर्भात आवश्यक त्या सूचना सर्वांना देण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.
सर्वसामान्यांना स्वस्त दरात तूरडाळ उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. केंद्राबरोबर राज्य शासनाने डाळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. किमतीबाबत व्यापाऱ्यांवर बंधने घालण्यात आली आहेत. आगामी कालावधीत खासगी व्यापाऱ्यांकडे आणि अंत्योदय व बीपीएलचा लाभ घेणाऱ्या ७० ते ७५ लाख शिधापत्रिकाधारकांना तूरडाळ उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती बापट यांनी दिली.
या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे, अतुल तेरखेडकर, माजी अध्यक्ष माऊली चवरे, सदानंद शिरदाळे, वासुदेव काळे, तानाजी थोरात, माऊली वाघमोडे, मारुतराव वणवे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपाचे काही कार्यकर्ते एकत्र आले होते. भावनेच्या भरात त्यांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला असावा. त्यास राज्यव्यापी स्वरूप असण्याची व देण्याची गरज नाही.
मंत्रिमंडळातील बदलांबाबत चर्चा होत असते. ती मुख्यमंत्र्यांनी संबंधितांबरोबर केली होती. माझ्या खात्यासंदर्भात काही निर्णय घेण्यात आला नव्हता. त्यामुळे माझ्याबरोबर चर्चा झाली नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर)
खडकवासला कालव्यातून दोन टीएमसी सोडणार...
पुण्यात व ग्रामीण भागात चांगला पाऊस झाला आहे. साधारणत: दोन टीएमसी पाणी खडकवासला कालव्यातून सोडण्यात येईल. पाटबंधारे विभागाच्या कालव्यांद्वारे पाणी सोडले तर ते विहिरी व शेतापर्यंत पोहोचेल, असे पालकमंत्री बापट यांनी सांगितले.
मी सर्वांच्या प्रेमात पडतो...
भाजपा सोडून इतर पक्षांच्या प्रेमात आपण आहात, या बद्दल बापट म्हणाले, मी सर्वांच्या प्रेमात पडतो; सर्वजण माझ्या प्रेमात पडतात. प्रेम करणं हा माणसाचा स्थायीभाव आहे, मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यात वाद आहे की नाही या प्रश्नााविषयी ‘तुम्ही म्हणाल तर आहेत, म्हणाल तर नाहीत’ असे सांगून संदिग्धता बापट यांनी कायम ठेवली.