आळंदीत पोलिसांच्या अरेरावीने जिल्हा परिषद अध्यक्षांना मंदिर प्रवेशास अर्धातास 'वेटिंग'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 04:02 PM2021-11-30T16:02:42+5:302021-11-30T16:24:26+5:30
दरम्यान मंदिर प्रवेशानंतर अध्यक्षा निर्मला पानसरेंनी हा प्रकार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सांगून पोलीस प्रशासनाच्या नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली
आळंदी : माऊलींच्या ७२५ व्या संजीवन सोहळ्यातील कार्तिकी एकादशीच्या महापूजेसाठी प्रमुख अतिथी आलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे (nirmala pansare) यांना बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या आडमुठ्या धोरणाचा सामना करावा लागला. विशेष म्हणजे निर्मला पानसरेंनी स्वतःची ओळख सांगूनही मंदिराबाहेर पानदरवाज्यात बंदोबस्ताला असलेल्या दोन सहायक पोलिसांच्या अरेरावीने मंदिर प्रवेशास सुमारे अर्धातास वेटिंग करावे लागले. त्यामुळे पोलीस प्रशासनाविरोधात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर तहसीलदार व देवस्थानने तत्परता दाखवून निर्मला पानसरेंना मंदिरात घेतले. मात्र या प्रकारामुळे व्हीआयपी मान्यवरांच्या दर्शन नियोजनाचा असलेला अभाव चव्हाट्यावर आला आहे.
कार्तिकी एकादशीच्या मुख्य पूजेला प्रमुख मान्यवर व पूजे संबंधित मोजक्या व्यक्तींना मंदिरात प्रवेश दिला जातो. मात्र मंगळवारी मध्यरात्री पार पडलेल्या पूजेला शेकडो जण उपस्थित होते. त्यात सर्वाधिक पोलीस व त्यांच्या मर्जीतील लोकांना मंदिरात प्रवेश देण्यात आला. दरम्यान रात्री साडे अकाराच्या सुमारास पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे महापूजेसाठी मंदिराच्या पश्चिमेकडील पानदरवाज्यात दाखल झाल्या. मात्र त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेल्या चेतन ज्ञानेश्वर मुंढे व अंबरीश देशमुख या दोन सहायक पोलिसांनी अध्यक्षांना मंदिर प्रवेशास मज्जाव केला. विशेष म्हणजे त्यांच्यासमोरच वेगवेगळ्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले पोलीस पानदरवाज्यातून मंदिरात सोडले जात होते.
दरम्यान मंदिर प्रवेशानंतर अध्यक्षा निर्मला पानसरेंनी हा प्रकार जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना सांगून पोलीस प्रशासनाच्या नियोजनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पानदरवाज्यात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांच्या अरेरावीचा अनेकांना सामना करावा लागला असून देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांचे ऐकत नसल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकाराची उपमुख्यमंत्री अजित पवार व गृहमंत्री दिलीप वळसे - पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे पानसरे यांनी सांगितले.