जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या निवड पुन्हा लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 01:28 PM2019-12-12T13:28:19+5:302019-12-12T13:34:34+5:30
नवीन पदाधिकारी आता नवीन वर्षातच
पुणे : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विषय समित्यांच्या सभापती पदाची मुदत येत्या २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. ग्रामीण विकास विभागाकडून पुढील सूचना येईपर्यंत पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर करु नका, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नागपूर येथील पाच दिवसांचे अधिवेशन संपल्यानंतरच या निवडणुका होण्याची शक्यता असल्याने ८-१० दिवसांसाठी जिल्हा परिषदांवर प्रशासक नियुक्तीची वेळ शासनावर येणार आहे.
राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता. त्यानंतर पुणे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची निवड कोणत्या तारखेला होणार याची उत्सुकता होती. यासंदर्भात बुधवारी ग्रामीण विकास विभागाच्या अवर सचिवांनी शासनाकडून सूचना येईपर्यंत या निवडणुकीचा कार्यक्रम किंवा तारखा घोषित करू नयेत, अशा सूचना दिल्या. येत्या २० डिसेंबरला पदाधिकाऱ्यांची मुदत संपणार आहे, यानंतरच पुढील सव्वा दोन वर्षांसाठी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवडीची प्रक्रिया सुरु करता येईल, असे मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीच्या तारखा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे १६ ते २१ डिसेंबर दरम्यान आहे. मंत्री आमदार व प्रमुख नेते यात व्यस्त असल्याने २१ डिसेंबरनंतर पदाधिकाऱ्यांची निवडणूक घेण्याबद्दलच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. यामुळे २१ डिसेंबरनंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर किमान ७ ते १० दिवसांचा कालावधी लागेल.
........
राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती
पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद बहुमत आहे. आगामी सव्वा दोन वर्षांसाठी पदाधिकारी निवडी करता १३ डिसेंबरपर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. त्यानंतर १४ डिसेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे अध्यक्ष बंगल्यावर इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी दिली.
......