जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष अन् सभापतिपदाची लवकरच निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 10:54 AM2019-12-11T10:54:08+5:302019-12-11T10:55:32+5:30
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे महिला प्रवर्गासाठी आरक्षित
पुणे : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समित्यांचे सभापती पदासाठी दिलेली मुदतवाढ येत्या २० डिसेंबर रोजी संपुष्टात येत आहे. यामुळे पुढील दोन वर्षांसाठी नव्याने पदाधिकारी निवड करणार आहे. शासनाने निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार येत्या दोन दिवसांत जिल्हाधिकारी पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर करणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
मंगळवारी (दि. १0) सांगली जिल्हाधिकारी यांनी तेथील अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक २१ डिसेंबर रोजी, तर विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक २३ डिसेंबरला जाहीर केली आहे़ त्यामुळे पुणेजिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची निवडणूक नेमकी कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. या पदासाठी इच्छुक महिला सदस्यांची संख्या मोठी आहे. प्रामुख्याने हवेली तालुक्यातील अर्चना कामठे, पूजा पारगे, अनिता इंगळे, मावळमधील शोभा कदम, शिरूर तालुक्यातील स्वाती पाचुंदकर यांच्यासह विद्यमान सभापती असलेल्या सुजाता पवार, राणी शेळके यांचीही नावे चर्चेत आहेत. तर उपाध्यक्षपदासाठी वीरधवल जगदाळे, बाबूराव वायकर, प्रमोद काकडे यांची नावे आघाडीवर आहेत. अध्यक्षपदासाठी काही ज्येष्ठ महिला सदस्यांनी दावा केला असून, त्यामध्ये इंदापूरच्या वैशाली पाटील, शिरूरच्या सुनीता गावडे यांचा समावेश आहे. इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.
......
पंचायत समिती सभापतिसाठी शुक्रवारी सोडत
जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या सभापतिपदाच्या पुढील दोन वर्षांसाठीच्या आरक्षणाची सोडत येत्या १३ डिसेंबर रोजी काढली जाणार आहे. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मंगळवारी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला.
च्नव्याने सभापतिपदासाठी आरक्षण सोडत काढली जाणार असून, त्यासाठी १३ पंचायत समित्यांचे यापूर्वीचे आरक्षण विचारात घेऊन चक्राकार पद्धतीने सभापतिपदाचे आरक्षण ठेवले जाईल.
च्अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आरक्षण हे चक्राकार पद्धतीने त्यात या प्रवर्गातील लोकसंख्येच्या निकषानुसार निश्चित केले जाईल. मात्र, महिला आणि ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. १३ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये ही आरक्षण सोडत होणार आहे.
.......