Pune ZP Election| जिल्हा परिषदेच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 08:30 AM2022-07-27T08:30:53+5:302022-07-27T08:33:00+5:30
५ ऑगस्ट रोजी हे आरक्षण अंतिम केले जाईल..
पुणे : ओबीसी आरक्षणासह जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांची सोडत गुरुवारी (दि. २८) काढली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. याबाबत मंगळवारी जाहीर सूचना प्रसिद्ध केली आहे.
जिल्ह्यात नवीन रचनेनुसार जिल्हा परिषदेचे ८२ गट झाले आहेत. त्यातील ५० टक्के आरक्षण म्हणजेच ४१ गट हे खुल्या प्रवर्गासाठी असतील; तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) २२ गट आरक्षित असतील. अनुसूचित जातीसाठी आठ, तर जमातीसाठी सहा आरक्षण सोडत काढली जाणार आहे. गुरुवारी आरक्षण सोडत काढल्यानंतर, शुक्रवारी नवीन आरक्षणाची प्रारूप अधिसूचना जाहीर केली जाईल. त्यानंतर या सोडतीवर २ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत. त्यावर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन निर्णय घेतील. त्यानंतर ५ ऑगस्ट रोजी हे आरक्षण अंतिम केले जाईल, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
जिल्हा परिषदेतील शरदचंद्र पवार सभागृहात सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद गटांसाठी सोडत काढली जाणार आहे. पंचायत समितीची साेडत जुन्नर-जिजामाता सभागृह पंचायत समिती, आंबेगाव - तहसील कार्यालयातील मिटिंग सभागृह, शिरूर - नवीन प्रशासकीय इमारत, खेड पंचायत समिती-चंद्रमा गार्डन, मावळ - जुना पुणे-मुंबई रस्त्यावर भेगडे गार्डन, मुळशी -सेेनापती बापट सभागृह पंचायत समिती, हवेली - जुनी जिल्हा परिषद, पुणे. दौंड - नवीन प्रशासकीय इमारत, पुरंदर - श्री. छत्रपती संभाजी महाराज सभागृह पुरंदर पंचायत समिती, भोर - अभिजित भवन मंगल कार्यालय, भोर, बारामती - मोरोपंत नाट्यमंदिर नवीन प्रशासकीय इमारतीसमोर, इंदापूर - लोकनेते शंकरराव पाटील सभागृह पंचायत समिती येथे होणार आहे.