जिल्हा परिषद शाळा राजकीय आश्वासनांच्या भोवऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 01:57 AM2018-06-13T01:57:24+5:302018-06-13T01:57:24+5:30
इंदापूर नगर परिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ व २ राजकीय आश्वासनांच्या भोव-यात अडकली आहे. इमारत दुरुस्तीसाठीचा निधी अद्याप उपलब्ध होऊनही न मिळाल्याने शाळा शेवटची घटका मोजत आहेत.
इंदापूर - इंदापूर नगर परिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. १ व २ राजकीय आश्वासनांच्या भोव-यात अडकली आहे. इमारत दुरुस्तीसाठीचा निधी अद्याप उपलब्ध होऊनही न मिळाल्याने शाळा शेवटची घटका मोजत आहेत. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे.
जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रवीण माने यांनी इंदापूर नगर परिषद हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १ व २ ला २ फेब्रुवारी २०१८ रोजी भेट दिली होती. त्या वेळी शाळादुरुस्तीसाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याचे जाहीर केले होते. यापैकी शाळा नं. १ साठी १५ लाख व शाळा नं. २ साठी १५ लाख व तारेच्या शाळेला ५ लाख रुपये अशा प्रकारे निधी मंजूर केला होता. परंतु, चार महिने उलटून गेले तरी शाळादुरुस्तीसाठीचा निधी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून उपलब्ध झालेला नाही.
सद्य:स्थितीत शाळा इमारत अत्यंत धोकादायक बनली आहे. पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी ए. एस. काथवटे यांनी इमारत जीर्ण व धोकादायक स्थितीत असल्याचे लेखी पत्राद्वारे शाळेला व नगर परिषद प्रशासनाला लेखी कळविले आहे. इमारत केव्हाही अचानक कोसळण्याच्या स्थितीत असल्याने इमारतीत शाळा न भरविता पर्यायी जागेत स्थलांतर करावे. त्या ठिकाणी शाळा भरविण्याच्या सूचना लेखी आदेशाने देण्यात आलेल्या आहेत. तसेच, सदर शाळा इमारतीची तत्काळ दुरुस्ती केल्याशिवाय विद्यार्थी शाळेत न बसविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
अशा प्रकारे शासकीय अधिकाºयांकडून जबाबदारी टाळण्याचे प्रकार चालू आहेत. या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गात संतापाची लाट पसरली आहे. अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल पालक वर्गातून करण्यात येत आहे. ही शाळा इमारत दुरुस्त करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे सन २०१३ पासून संबंधित विभाग, इंदापूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी व इंदापूर नगर परिषदेकडे वारंवार पाठपूरावा करीत आहेत. विद्यार्थ्यांचे शालेय नुकसान होऊ नये; म्हणून १२ जून रोजी मनसेच्या वतीने इंदापूर शहरातून भीक माँगो आंदोलन करण्यात येणार आहे. त्याबाबतचे निवेदन संबंधित विभागांना देण्यात आले आहे. जमा होणाºया निधीतून इमारत दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याचे हजारे यांनी सांगितले.
गटशिक्षणाधिकारी ए. एस. काथवटे यांनी सांगितले, की मंजूर झालेला निधी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे शाळादुरुस्तीचे काम सुरू होऊ शकले नसल्याची माहिती दिली.
जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रवीण माने यांचा मोबाईल बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. इंदापूर नगर परिषद मुख्याधिकाºयांनी सांगितले, की सदर निधी आमच्या विभागाकडे येत नाही. जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागाकडे निधी जमा होत असल्याचे ते म्हणाले.
पर्यायी व्यवस्था नसल्याने अडचण...
पावसाळा सुरू झालेला आहे. अवघ्या ४ दिवसांनी शाळा सुरू
होणार आहे. ४५० हून अधिक विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या जीविताचा विचार करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित विभागाकडून कसलीही पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात आलेली नाही.
भविष्यात जीर्ण इमारतीच्या बाबतीत अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी इंदापूर नगर परिषदेची असल्याचे गटशिक्षणाधिकाºयांनी पत्रात नमूद केले आहे. हे पत्र पाठवून त्यांनी जबाबदारी झटकली आहे, तर नगर परिषदेनेसुद्धा तशाच प्रकारचे पत्र गटशिक्षणाधिकाºयांना पाठवून पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी झटकली आहे.