जिल्हा परिषदेचा ग्रामपंचायतींना अडीच कोटींचा लाभांश
By admin | Published: January 3, 2017 06:31 AM2017-01-03T06:31:22+5:302017-01-03T06:31:22+5:30
जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कर्जांवर व्याजापोटी जमा झालेली तब्बल अडीच कोटींची रक्कम पुन्हा ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आली आहे.
पुणे : जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या कर्जांवर व्याजापोटी जमा झालेली तब्बल अडीच कोटींची रक्कम पुन्हा ग्रामपंचायतींना वाटप करण्यात आली आहे. नव्या वर्षात जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना लाभांशवाटप करून खास भेट दिली आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सांगितले, की जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाच्या ०.२५ टक्के जिल्हा ग्राम निधीवर दरसाल दर शेकडा २.५० टक्के या दराने व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सन २००९-१० पासून गेल्या सहा वर्षांत या निधीचे वाटप केले नव्हते. याबाबत नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत गेल्या सहा वर्षांत या व्याजापोटी जमा झालेला सर्व निधी संबंधित ग्रामपंचायतींना वाटप करण्यात निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जिल्ह्यातील १४०७ ग्रामपंचायतींना २ कोटी ३९ लाख ३२ हजार रुपयांचे वाटप करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने दर वर्षी आपल्या स्वनिधीतून ५ टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. ही व्याजाची रक्कम संबंधित ग्रामपंचायतींच्या करारातून जमा झालेली असते. त्यामुळे तिचा उपयोग ग्रामपंचायतींच्या विकासासाठी झाला पाहिजे, या उद्देशाने हा निधी पुन्हा ग्रामपंचायतींना देण्यात येत असल्याचे कंद यांनी सांगतिले.