जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 02:05 AM2018-12-08T02:05:58+5:302018-12-08T02:06:06+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आरोग्यसेवेत राज्यात बाजी मारली आहे.

Zilla Parishad's health department tops the state | जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल

जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल

पुणे : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या आरोग्यसेवेत राज्यात बाजी मारली आहे. राज्य शासनाने केलेल्या सर्वेक्षणात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, पीपीआययूसीडी, गरोदर माता नोंदणी, लसीकरण यांसह अन्य आरोग्यसेवा चांगल्या दर्जाच्या पुरवल्याचे आढळले असून, त्यासाठी त्यांना शंभरपैकी ८२ गुण मिळाले आहेत. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हा आकडा चांगला असल्याने पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात अव्वल ठरला आहे.
ग्रामीण भागात आरोग्यसेवा पुरविण्याचे काम हे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे असते. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राच्या साह्याने तसेच आरोग्यसेवकांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. या आरोग्यसेवेची पाहणी करण्यासाठी तसेच राज्यातील आरोग्यसेवा चांगल्या पद्धतीने सुरू राहावी आणि रुग्णांना सेवा देताना तत्काळ व उत्तम सेवा मिळते की नाही, हे पाहण्यासाठी राज्य शासनाकडून दर वर्षी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे रँकिंग काढण्यात येते. यामध्ये प्रत्येक विभागात कशा पद्धतीने काम सुरू आहे, रुग्णांची नोंदणी, साथीच्या रोगांवर कशा पद्धतीने नियंत्रण आणले, तत्काळ आरोग्यसेवा या सर्व गोष्टींचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात प्रत्येक गोष्टीला स्वतंत्र गुण दिले जातात. या सर्वेक्षणात पुणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग हा अव्वल ठरला. कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, पीपीआययूसीडी, गरोदर माता नोंदणी, लसीकरण यांसह अन्य आरोग्यसेवा चांगल्या दिल्याने त्यांना या सर्वेक्षणात ८२ गुण मिळाले.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागप्रमुख डॉ. दिलीप माने यांनी जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपक्रेंद्रांतील सेवेला शिस्त लावून आवश्यक त्या नोंदी तत्काळ करून घेतल्या.
यामध्ये कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, गरोदर मातांची नोंदणी आणि वेळोवेळी पाठपुरावा करणे, लसीकरणात उत्तम काम केले आहे. तसेच, स्वाइन फ्लूच्या साथीदरम्यान आरोग्य विभागाने चांगले काम केल्याने सर्वाधिक गुण देण्यात आले.
>अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांमुळे पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला प्रथम क्रमांक मिळू शकला. कर्मचाऱ्यांच्या कष्टाचे हे फळ आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आणि आरोग्य विभागाचे सभापती प्रवीण माने यांचेही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळाले. हा क्रमांक टिकवून ठेवण्यासाठी आणि प्रत्येक रुग्णाला चांगली आरोग्यसेवा देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत.
- डॉ. दिलीप माने, आरोग्यप्रमुख,
जिल्हा परिषद, पुणे

Web Title: Zilla Parishad's health department tops the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.