जिल्हा परिषदेची खासगी शाळांना टक्कर
By admin | Published: April 18, 2017 02:51 AM2017-04-18T02:51:28+5:302017-04-18T02:51:28+5:30
प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील तब्बल ४२ हजार मुलांना
पुणे : प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेने यंदा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे अंगणवाडीतील तब्बल ४२ हजार मुलांना एक एप्रिलपासून पहिलीच्या वर्गात प्रवेश दिला आहे.
या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेची आवड निर्माण व्हावी, यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यात एकूण ३ हजार ७०० शाळा आहेत. या शाळांमध्ये गुणवत्ता विकासवाढीसाठी नवनवीन उपक्रम राबवले जातात. परंतु, तरीही जिल्हा परिषदेच्या शाळेऐवजी खासगी शाळांना पालक प्राधान्य देत आहेत.
ग्रामीण भागामध्ये खासगी शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे खासगी शाळांचे आव्हान लक्षात घेऊन प्राथमिक शाळांमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा म्हणून आता नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत.
खासगी शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा टिकविण्यासाठी विषेश प्रयत्न म्हणून हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच खासगी शाळांच्या धर्तीवर प्राथमिक शाळांची जाहिरात स्थानिक पातळीवर करणार आहे. तसेच आपल्या शाळेतून शिकलेले माजी विद्यार्थी यांचे सध्याचे सामाजिक स्टेटस समाजासमोर आणण्यासाठी विषेश प्रयत्न करण्यात येणार आहेत. जेणेकरून प्राथमिक शाळेबद्दल पालकांच्या मनामध्ये आश्वासकता निर्माण व्हावी, याकडे लक्ष देण्यात येणार आहे, असे दौलत देसाई यांनी सांगितले. (वार्ताहर)