जिल्हा परिषदेच्या शाळाही टेक्नोसॅव्ही!
By admin | Published: April 17, 2015 11:30 PM2015-04-17T23:30:31+5:302015-04-17T23:30:31+5:30
ग्रामीण भागातील शाळा व शिक्षक टेक्नोसॅव्ही बनत असल्याचे शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार यांनी सांगितले.
पुणे : एबीएल कार्ड, संगणक, इ लर्निंग आणि इंटरनेटर याचा वापर करून शिक्षक विद्यार्थ्यांना रंजकपणे शिकवत असून ग्रामीण भागातील शाळा व शिक्षक टेक्नोसॅव्ही बनत असल्याचे शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव नंद कुमार यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थीही आता मोबईलमुळे ‘सोशल’ होत आहेत. याचा विचार करून त्यांचे शिक्षणही रंजक व्हावे म्हणून शिक्षणासाठी सोशल मीडियाचा वापर होणार आहे. यासाठी सर्वशिक्षा अभियानांतर्गत बुधवारी एक कार्यशाळा घेण्यात आली असून, याचा प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी नंद कुमार बोलत होते.
जिल्हा परिषदेत ही कार्याशाळा झाली. या वेळी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, शिक्षण संचालक (प्राथमिक) महावीर माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप, शिक्षण उपसंचालक दिनकर टेमकर, शिक्षणाधिकारी मुश्ताक शेख, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) हारून आतार, शिक्षणाधिकारी (निरंतर) वैशाली जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.
दैनंदिन अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर करून अध्ययन अध्यापनात रंजकता आणणे, विद्यार्थ्यांचा वर्गातील प्रत्येक कृतीमध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्यांना स्वयंअध्ययनास प्रवृत्त करणे, सहज व सुलभ अध्ययनास चालना देणे, याविषयी मार्गदर्शन व चर्चा करण्यात आली.
सोशल मीडियाचा शिक्षणात प्रभावी वापर व्हावा, परंतु त्याचा शैक्षणिक कारणांसाठीच वापर केला जावा अशा सूचना शिक्षण संचालक महावीर माने यांनी या वेळी दिल्या.
जिल्ह्यातील शाळा आयएसओ मानांकनात सर्वाधिक आहेत.
शाळांचे कामकाज उत्तम सुरू आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत
दाखल होत असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतिलाल उमाप यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
इंग्रजीची भीती कमी व्हावी, गणितासारखा विषय सोप्या पद्धतीने शिकविता यावा, विद्यार्थ्यांना जगाची अद्ययावत माहिती व्हावी यासाठी सोशल मीडियाचा चांगल्याप्रकारे वापर शिक्षकांनी वापर करावा.
- नंद कुमार,
प्रधान सचिव , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग