जिल्हा परिषदेच्या शाळा आनंदी करा! संजय मालपाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 02:52 AM2017-11-27T02:52:30+5:302017-11-27T02:52:59+5:30
मुलगा खेळत असला की खेळू नको, अभ्यास कर असे सारखे म्हणून त्याच्या मनात अभ्यासाची भीती निर्माण होऊ देऊ नका. संवादातून, खेळातून त्याच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करा, असा सल्ला देत जिल्हा परिषदच्या शाळा मुक्त व आनंदी झाल्या पाहिजेत यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत
घोडेगाव : मुलगा खेळत असला की खेळू नको, अभ्यास कर असे सारखे म्हणून त्याच्या मनात अभ्यासाची भीती निर्माण होऊ देऊ नका. संवादातून, खेळातून त्याच्यात अभ्यासाची गोडी निर्माण करा, असा सल्ला देत जिल्हा परिषदच्या शाळा मुक्त व आनंदी झाल्या पाहिजेत यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिक्षणतज्ज्ञ संजय मालपाणी यांनी घोडेगाव येथे आयोजित शिक्षण परिषदेमध्ये केले.
आंबेगाव तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाने तालुक्यातील शिक्षकांसाठी शिक्षण परिषद व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती. पहिल्या सत्रात संगमनेर येथील ध्रुव अकॅडमीचे संजय मालपाणी यांचे व्याख्यान झाले.
या वेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पंचायत समिती सभापती उषा कानडे, उपसभापती नंदा सोनावले, माजी सभापती कैलासबुवा काळे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पंचायत समिती सदस्य संजय गवारी, संतोष भोर, इंदुबाई लोहकरे, आशा शेंगाळे, रूपाली जगदाळे, सुभाष मोरमारे, प्रकाश घोलप, सुषमा शिंदे तसेच उपशिक्षणाधिकारी शैलजा दराडे, गटशिक्षणाधिकारी पोपटराव महाजन इत्यादी उपस्थित होते. या वेळी प्रास्ताविक गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांनी केले.
या वेळी देण्यात आलेल्या शिक्षक पुरस्कारामध्ये संजय तुकाराम बुरूड (तिरपाड), सुरेश खंडु रोंगटे (माळीण), मनोहर शंकर थोरात (फणसवाडी), शांताराम होनाजी भांगे (नंदकरवाडी), मीनाक्षी साहेबराव राईबोले (फलौंदे), प्रशांत रघुनाथ ढवळे (पोखरी), मंगेश तुकाराम बुरूड (पाडळवाडी), दत्तात्रय सखाराम मेचकर (ठाकरवाडी), दिनेश लक्ष्मण बांबळे (ठाकरवाडी), संजीव काळूराम ढोंगे (तळेकरवाडी), विजय केरभाऊ चिखले (गणेशवाडी), राजेश्री राजाराम काथेर (पिंपळगाव), रामदास बाजीराव सैद (ठाकरवाडी), सीमा वल्लभ करंदीकर (कोटमदरा), सुभाष दशरथ लिंगे (वडगाव काशिंबेग), चांगदेव बबन पडवळ (शेवाळवाडी), सीताराम शांताराम गुंजाळ (थुगाव), अनुराधा ज्ञानेश्वर होनराव (शिंदेमळा), सखाराम हनुमंत गुंजाळ (मेंगडेवाडी), नितीन भास्कर शेजवळ (पिंपळगाव तर्फे महाळुंगे), संतोष बबनराव जाधव (साकोरमळा), रेखा सुनील वळसे (जारकरवाडी), दत्तात्रय बाजीराव पोखरकर (मांदळेवाडी) या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती विवेक वळसे पाटील म्हणाले, की तालुक्यातील शिक्षकांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संजय मालपाणी यांनी सांगितल्याप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास जागृत करण्याचे काम शिक्षकांना करायचे आहे. दैववादी पिढी घडविण्यापेक्षा प्रयत्नवादी पिढी घडवा, असे आवाहन त्यांनी केले.
सर्वंकष मूल्यमापण : काटछाट करून शाळेपर्यंत
या वेळी संजय मालपाणी म्हणाले, सर्वंकष मूल्यमापन कार्यक्रम मी तयार करून शासनाला सादर केला. त्याची अंमलबजावणी झाली; मात्र त्यामध्ये खूप काटछाट करून तो शाळेपर्यंत पोहचला. त्यामुळे याचा अपेक्षीत परिणाम दिसला नाही. शिक्षकांनी सर्वंकष मूल्यमापन व शिक्षण हक्क अधिनियम याचा पुरेपूर वापर करून शिक्षणामध्ये बदल घडविला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
या वेळी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी व शिक्षकांनी केलेल्या शैक्षणिक साहित्याची पाहणी मान्यवरांनी केली. यामध्ये लांडेवाडी चिंचोडी शाळेतील श्रेया विनोद भैये हिने सादर केलेला उपक्रम व उत्तरे ऐकून संजय मालपाणी प्रभावित झाले. या कार्यक्रमात त्यांनी या मुलीचे व तिला शिकविणाºया संजय बबन वळसे या शिक्षिकेचे कौतुक केले.