डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 01:36 AM2017-11-08T01:36:59+5:302017-11-08T01:37:11+5:30
डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांची ‘एलायझा’ तपासणी केल्यावर ती ‘निगेटीव्ह’ येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यूसदृश तापाने उपराजधानी फणफणली आहे. मेयो, मेडिकलच्या बाह्यरुग्ण विभागात अशा रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे, या रुग्णांची ‘एलायझा’ तपासणी केल्यावर ती ‘निगेटीव्ह’ येत आहे. परंतु याची लक्षणे व धोका तेवढाच गंभीर असल्याने डॉक्टर असे रुग्ण आपल्या देखरेखीत ठेवत आहे. या रुग्णांमध्ये लहान मुलांसोबत तरुणांची संख्या मोठी आहे.
उपराजधानीत गेल्या पाच वर्षांत डासांच्या दंशाने मलेरियाच्या तुलनेत डेंग्यूचा फैलाव झपाट्याने झाला. या रोगामुळे नागपुरातील जनता चांगलीच त्रस्त झाल्याचे चित्र आहे. शहरात २०१२ मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. २३७ रुग्ण व पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर २०१३ मध्ये ही संख्या २४०वर पोहचली. यात दोन जणांना प्राण गमवावे लागले. २०१५ मध्ये २३० रुग्ण आढळून आले होते. २०१६ मध्ये १९५ रुग्णांना डेंग्यू तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर या वर्षी आतापर्यंत १३७ रुग्ण आढळून आले. महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभाग जनजागृती सोबतच घराघरांची तपासणी करून डेंग्यूच्या अळ्या आढळून येणारी कुलर्स, पाण्याच्या टाक्या, ड्रम, कुंड्या, फुलदाणी हे आपल्यासमक्ष रिकामी करून किंवा त्यात कीटकनाशक औषध फवारणी किंवा गप्पी मासे सोडून उपाययोजना करीत आहे. यामुळे काही प्रमाणात यावर नियंत्रण मिळविणे शक्य झाले आहे. परंतु प्रत्येकाने आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळला व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवल्यास डेंग्यूचा प्रकोप कमी करणे शक्य असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
तूर्तास शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी दिसत असली तरी डेंग्यू रोगाची लक्षणे असलेले रुग्ण मोठ्या संख्येत दिसत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डेंग्यूसदृश आजाराकडे दुर्लक्ष करू नका
मेयो रुग्णालयाच्या बालरोग विभागाचे प्रभारी विभाग प्रमुख डॉ. दीपक मडावी यांनी सांगितले, सध्या रुग्णालयात तापाचे रुग्ण वाढले आहे. यात डेंग्यूची लक्षणे असलेली परंतु डेंग्यू नसलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. यामुळे अशी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ताप कमी होत नसेल तर पुन्हा डॉक्टरांना भेटावे, असेही ते म्हणाले.