दारुबंदीच्या गावातच दारूचा महापूर
By admin | Published: April 28, 2017 12:17 AM2017-04-28T00:17:57+5:302017-04-28T00:17:57+5:30
महिलांच्या पुढाकाराने येथे दारूबंदी तर झाली. परंतु पोलिसांच्या वरदहस्तामुळे गावातील काही अवैध
निराशा : टाकरखेड्यात मद्यपींचा हैदोस
टाकरखेडा संभू : महिलांच्या पुढाकाराने येथे दारूबंदी तर झाली. परंतु पोलिसांच्या वरदहस्तामुळे गावातील काही अवैध दारूविक्रेत्यांच्या मनमानीमुळे गावात दारूचा महापूर आल्याचे चित्र दिसून येत आहे. मद्यपींच्या हैदोसाला महिला कंटाळल्या आहेत.
टाकरखेडा संभू या गावात दारूमुळे हत्येसह अनेक अपराधिक घटना घडल्या आहेत. यामुळे महिला कंटाळल्या होत्या. त्यामुळे महिलांनी संघटित होऊन १२ वर्षांपूर्वी दारूबंदीचा नारा लावला आणि गावातून दारूचे दुकान हद्दपार केले आणि त्याच दिवशी महिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मात्र, काही समाजकंटकांनी चक्क पोलिसांना हताशी धरून गावात अवैध दारू विक्री सुरु केली.
एकीकडे पाण्याची टंचाई तर दुसरीकडे दारूचा महापूर आशी स्थिती गावात निर्माण झाली आहे. ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन, आठवडी बाजार आणि ग्रामपंचायतनाजीकचा परिसर आदी ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात दारू विक्री होत आहे. यावर पोलिसांच्या वचक नाही. त्यांमुळेच खुलेआम दारू विक्री होत असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे आता गावात भांडण तंटे मोठ्या प्रमाणात होऊ लागले आहेत. परिणामी पुन्हा महिलांचा त्रास वाढला आहे.
माहिलांनी गावातील दारूचे दुकान बंद तर केले, परतु गावात अवैध दारूची मोठ्या प्रमाणात आयात केली जात आहे. या प्रकाराकडे पोलिसांचे लक्ष का नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावातील दारूचे दुकान महत्प्रयासाने बंद केले असले तरी अवैध दारू विके्रत्यांचे भूत महिलांच्या मानगुटीवर आजही कायम आहे. (वार्ताहर)