तीन अपघातात पाच जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:40 AM2019-03-07T00:40:12+5:302019-03-07T00:40:49+5:30

मार्गातील खड्ड्यांमुळे ६ मार्च रोजी बुधवारला चामोर्शी तालुक्यात बुधवार हा अपघातवार ठरला. चामोर्शी-घोट, चामोर्शी-आष्टी मार्गावर एकाच दिवशी झालेल्या तीन अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. या चौघांना उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Five injured in three accidents | तीन अपघातात पाच जखमी

तीन अपघातात पाच जखमी

Next
ठळक मुद्देगडचिरोलीला हलविले : चामोर्शीत बुधवार ठरला अपघातवार

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : मार्गातील खड्ड्यांमुळे ६ मार्च रोजी बुधवारला चामोर्शी तालुक्यात बुधवार हा अपघातवार ठरला. चामोर्शी-घोट, चामोर्शी-आष्टी मार्गावर एकाच दिवशी झालेल्या तीन अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. या चौघांना उपचारासाठी गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. चामोर्शी ते घोट, आष्टी व मूल हे तीनही मार्ग खड्डेमय झाल्याने येथे अपघाताची मालिका सुरू आहे.
चामोर्शी-घोट मार्गावर कृष्णनगरजवळ मारोती बलोनो कार व दुचाकीची सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीस्वारासह मागील सिटवर बसलेली महिला जखमी झाली. एमएच-३३-व्ही-२०२७ या क्रमांकाचे मारोती बलोनो वाहन चामोर्शीवरून घोटकडे जात होते. दरम्यान एमएच-३३-पी-६९८३ क्रमांकाची दुचाकी विरूद्ध दिशेने येत होती. खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात या दोन वाहनाची समोरासमोर धडक बसली. सदर धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकी ही चारचाकी वाहनाच्या बोनेटवर चढली व काच पूर्णत: फुटली. या अपघातात नरेश देवराव येरावार, चंदा देवराव येरावार, देवराव कवडू येरावार अशी जखमींची नावे आहेत. या जखमींना सुरूवातीला चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालात हलविण्यात आले.
दुसरी घटना दुपारी १२.३० वाजता चामोर्शी-आष्टी मार्गावरील घोट वळणावर घडली. येथे दोन दुचाकींची धडक होऊन एक मुलगी जखमी झाली. देविका कमलेश मडावी (१८) असे जखमी मुलीचे नाव आहे. या मुलीसोबत दुचाकीवर प्रफुल मंगर व अजित पाल हे दोघेजण होते. मात्र या अपघातात त्यांना काहीही झालेले नाही. सदर अपघातातील विरूद्ध दिशेने येणाऱ्या वाहनावरील निखिल बाबुराव कुरवटकर (१९) हा युवक गंभीर जखमी झाला आहे. या दोघांनाही जमावातील काही नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांना गडचिरोलीला हलविण्यात आले. दरम्यान याचवेळी आष्टी-चामोर्शी मार्गावर एका वृद्ध इसमाच्या दुचाकीला अपघात झाला. यात वृद्ध इसमाचा पाय दुचाकीत सापडल्याने तो किरकोळ जखमी झाला. सदर दोन अपघातातील जखमी चार जणांवर गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात तर देविका मडावी या जखमी मुलीवर चामोर्शीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
सिरोंचा मार्गावर वाहन उलटले
आलापल्ली-सिरोंचा मार्गावर गोलाकर्जीवरून चार किमी अंतरावर सिमेंटच्या बॅग घेऊन जाणारे वाहन उलटले. यात वाहनाचा चालक जखमी झाला. सदर घटना रिंग पुलावर बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. वृत्त लिहिस्तोवर या अपघातातील चालकाचे नाव कळू शकले नाही. सिरोंचा मार्गावर गेल्या काही दिवसांपासून चारचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे.

Web Title: Five injured in three accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात