२०० कोटींची अवैध दारू आणि रोकड जप्त; राजस्थानात छापेमारी, अमली पदार्थांचे चलनही जोरात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2023 08:58 AM2023-10-24T08:58:38+5:302023-10-24T08:59:39+5:30
ईडीची होत असलेली कारवाई हाच काँग्रेसचा विजय होणार याचा पुरावा आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, जयपूर : राजस्थानमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार राज्यातील विविध अंमलबजावणी संस्था अवैध साहित्य जप्त करण्याच्या बाबतीत रोज नवनवीन विक्रम करीत आहेत. ९ ऑक्टोबर रोजी आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर अंमलबजावणी यंत्रणांनी २०० कोटींहून अधिक किमतीची अवैध दारू, रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
२०१८च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या संपूर्ण आचारसंहितेदरम्यान ६५ दिवसांत ७० कोटी रुपयांचे अवैध साहित्य जप्त करण्यात आले होते. मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी सांगितले की, राज्यातील विविध यंत्रणांनी जारी केलेल्या अहवालानुसार ३२ कोटी ६७ लाख रुपयांच्या जप्तीसह जयपूर राज्यात आघाडीवर आहे. दुसऱ्या क्रमांकावर १३ कोटी ३४ लाख रुपयांसह बांसवाडा, तिसऱ्या क्रमांकावर १२ कोटी ७४ लाख रुपयांसह उदयपूर, चौथ्या क्रमांकावर १२ कोटी रुपयांसह अलवर, तर १० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या जप्तीसह बाडमेर पाचव्या स्थानावर आहे.
बाडमेरमध्ये ७ कोटींचे ड्रग्ज जप्त
अवैध दारू जप्तीत अलवर पहिल्या क्रमांकावर आहे. तेथे ४ कोटी ३० लाख रुपयांचे मद्य जप्त झाले. अमली पदार्थ जप्तीच्या बाबतीत बाडमेर पुढे आहे. तेथे ७ कोटी ४० लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. ७ कोटी ७७ लाख रुपयांची अवैध रोकड जप्त करून जयपूर पहिल्या क्रमांकावर आहे. ११.१४ कोटी रुपयांचे सोने आणि चांदीसारखा मौल्यवान धातू जप्त करून बांसवाडा पहिल्या स्थानावर आहे.
हाच काँग्रेसच्या विजयाचा पुरावा : अशोक गेहलोत
निवडणुका तोंडावर आल्या असतानाच राज्यात सातत्याने ईडीकडून कारवाई केली जात आहे. सरकारी यंत्रणांचा वापर करून भाजपकडून काँग्रेस नेत्यांना त्रास दिला जात आहे. ईडीची होत असलेली कारवाई हाच काँग्रेसचा विजय होणार याचा पुरावा आहे, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.