हृदयद्रावक! हायवेवर कारचं टायर फुटलं; ३ वर्षाची चिमुकली सोडून अख्खं कुटुंब संपलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 04:37 PM2023-09-05T16:37:43+5:302023-09-05T16:38:01+5:30
दाम्पत्याची ३ वर्षाची मुलगी किया आणि कारचालक दोघे जखमी झाले. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत
जयपूर – राजस्थानच्या भीलवाडा येथील अजमेर-चित्तोढगड हायवेवर मंगळवारी एका रस्ते अपघातात अमेरिकेहून आलेल्या एका दाम्पत्यासह कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातात दाम्पत्याची ३ वर्षाची मुलगी बचावली आहे. मृतांमध्ये आई वडील, मुलगा सून यांचा समावेश आहे. यातील ३ वर्षीय चिमुकली सध्या जखमी असून तिच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे कुटुंब नाथद्वारा येथील श्रीनाथजी मंदिरातून दर्शन करून पुन्हा अजमेरला परतत होते.
ट्रकच्या धडकेत कार हवेत उडाली
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, मंगळवारी सकाळी ७ च्या सुमारास चालत्या कारचा टायर अचानक फुटला. त्यामुळे कार दुभाजकाला धडकून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ट्रकला टक्कर दिली. ट्रकचा वेग जास्त असल्याने ही कार हवेत उडाली आणि जमिनीवर जोरदार आपटली. या भीषण अपघातात कुटुंबातील प्रमुख राधेश्याम खंडेलवाल, पत्नी शंकुतला देवी, मुलगा मनिष आणि सून यशिका यांचा मृत्यू झाला. तर दाम्पत्याची ३ वर्षाची मुलगी किया आणि कारचालक दोघे जखमी झाले. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांच्या नातेवाईकांना पोलिसांनी कळवले आहे.
अमेरिकेहून परतलेले मुलगा-सून आणि नात
मृत कुटुंबाचे नातेवाईक संदीप शर्मा म्हणाले की, हे कुटुंब अजमेरला राहत होते. मृत राधेश्याम खंडेलवाल हे बँकेतून सेवानिवृत्त झाले होते. त्यांचा मुलगा मनिष खंडेलवाल, सून यशिका आणि ३ वर्षाची नात किया हे अमेरिकेत राहत होते. मुलगा-सून आणि नात सुट्टी घालवण्यासाठी मायदेशी परतले होते. त्यामुळे राधेश्याम आणि त्यांची पत्नी खूप आनंदात होते. सोमवारी रात्री श्रीनाथजीचं दर्शन घेण्यासाठी गेले होते. तिथून परतताना ही दुर्घटना घडली अशी माहिती त्यांनी दिली.