राजस्थानमधील निवडणूक प्रचारात अचानक ‘मुख्यमंत्रिपद’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 06:36 AM2023-11-24T06:36:01+5:302023-11-24T06:36:44+5:30

आधी वडिलांचा, आता मुलाचा हाेताेय अवमान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका

A sudden 'Chief Ministership' in the campaign of rajasthan election rally | राजस्थानमधील निवडणूक प्रचारात अचानक ‘मुख्यमंत्रिपद’

राजस्थानमधील निवडणूक प्रचारात अचानक ‘मुख्यमंत्रिपद’

लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : गुर्जर समाजाचा एक नेता राजकारणात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु, सत्ता मिळाल्यानंतर मात्र त्यांचा अवमान करत दूर केले, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली. राजेश पायलट यांचा काँग्रेसने अवमान केलाच, आता तेच सचिन पायलट यांच्यासोबत केले जात आहे, असेही मोदी म्हणाले.  

मोदी म्हणाले, काँग्रेसकडून गुर्जर समाजाचा वारंवार अवमान केला जात आहे. त्याला इतिहासही साक्षीदार आहे. १९९७ मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी राजेश पायलट यांनी सीताराम केसरी यांच्याविरोधात उमेदवारी दाखल केली होती. त्यावरून त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाईही झाली होती. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले, राजेश पायलट यांच्याबाबत त्यावेळी जे झाले, तेच आता सचिन पायलट यांच्यासोबतही केले जात आहे. परंतु, काँग्रेसकडून ही बाब फेटाळली जात असली, तरी त्यांनी पायलट परिवाराचा अवमान केला की नाही हे सांगावे, असे आव्हानही मोदी यांनी यावेळी दिले.

तुष्टीकरणामुळे जनता त्रस्त : शाह

सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या घराणेशाही, भ्रष्टाचार आणि तुष्टीकरणाच्या धोरणामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. 
निवडणुकीनंतर राज्यात भाजपची सरकार सत्तेत येईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. 
राज्यात मागील ५ वर्षांमध्ये महिला आणि दलितांवर प्रचंड अन्याय झाले. यावर कारवाई करण्यात काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. 
काँग्रेसने प्रचाराच्या वेळी सात गॅरंटी दिल्या, मात्र त्यांना पुन्हा सत्तेत येण्याची तरी गॅरंटी आहे का, अशी टीकाही शाह यांनी केली.

हा तर गुर्जर समाजाला भडकाविण्याचा कट

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे प्रत्युत्तर

लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसचे नेते राजेश पायलट आणि त्यांचे पुत्र सचिन पायलट यांच्याबाबत केलेले विधान हे राजस्थानमधील गुर्जर समाजाला भडकाविण्याचे कारस्थान असल्याची टीका मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली. कॉंग्रेस प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

गेहलोत म्हणाले की, राजस्थानमध्ये सत्तेत येण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. त्यासाठी ते वारंवार लालडायरीचा उल्लेख करत आहे. भाजपचे ते एकप्रकारचे षडयंत्र आहे. त्यांची हिंमत असेल, तर निवृत्त न्यायधीशांकडून चौकशी करावी. सत्य लोकांपुढे येईलच. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून राजस्थानमध्ये ५० छापे टाकण्यात आले. परंतु अद्याप एकही नेता वा अधिकाऱ्याला अटक झाली नाही. छापेमारीतून काय सिद्ध झाले?  छत्तीसगडमध्येही निवडणुकीच्या चार दिवसांपूर्वी महादेव ॲप प्रकरण त्यांनी उपस्थित केले, परंतु काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे भाजपने कितीही खोटे प्रयत्न केले, तरी राज्यात पुन्हा कॉंग्रेसच पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास गेहलोत यांनी व्यक्त केला.

‘यंदा परंपरा मोडणार, काॅंग्रेस सत्तेत येणार’ 

अशोक गेहलोत सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजना आणि पुन्हा सत्तेत आल्यास दिलेल्या सात गॅरंटीमुळे राजस्थानमधील वातावरण हे कॉंग्रेसच्या बाजूने आहे. 
त्यामुळे यंदा सत्तापालट होण्याची परंपरा मोडून कॉंग्रेस पुन्हा सत्तेवर येईल, असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला. 
खरगे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले, की वीर आणि सरदारांची भूमी असलेल्या राजस्थानमध्ये कॉंग्रेसने विविध कल्याणकारी योजना राबवत लोकांचा विश्वास जिंकला आहे. 

 

 

Web Title: A sudden 'Chief Ministership' in the campaign of rajasthan election rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.