पोलिस शिपायाच्या दोन्ही मुलांचा 'नीट' अभ्यास; एकाचेवेळी मुलगा अन् मुलगीही पास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 05:44 PM2023-06-19T17:44:16+5:302023-06-19T17:45:38+5:30
ओबीसी कॅटेगिरीतून देशात १५०० वी रँक घेऊन आहे, तर मुलीने १५,००० वी रँक मिळवत नीट परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे यावर्षी दोघांनीही घरीच अभ्यास केला होता.
जयपूर - राजस्थानच्या अलवर पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाच्या दोन्ही मुलांनी NEET परीक्षेत दैदिप्यमान यश मिळवत आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. अलवरच्या अरावली विहार पोलीस ठाण्यात कार्यरत पोलिस कॉन्स्टेबल विश्राम यादव यांच्या दोन्ही मुलांचे नीट परीक्षेतून डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. मुलगा देवेंद्र हा ओबीसी कॅटेगिरीतून देशात १५०० वी रँक घेऊन आहे, तर मुलीने १५,००० वी रँक मिळवत नीट परीक्षा उत्तीर्ण केली. विशेष म्हणजे यावर्षी दोघांनीही घरीच अभ्यास केला होता.
मुलांचे पालक आणि पोलीस कॉन्स्टेबल विश्राम यांनी सांगितले की, मुलगा देवेंद्र आणि मुलगी गायत्री हे नीट परिक्षेत उत्तीर्ण झाले असून त्यांची निवड निश्चित झाली आहे. दोघांनीही यंदा घरीच बसून परीक्षेची तयारी केली होती. तत्पूर्वी गेल्यावर्षी कोटा येथे कोचिंग क्लास केला होता. मात्र, यंदा दोघांनाही यश मिळाले आहे, मुलीने तिसऱ्या तर मुलाने चौथ्या प्रयत्नात हे यश मिळवले. दोघांच्याही निवडीमुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण असून सर्वांनीच त्यांचे अभिनंदन केले आहे.
पोलीस कॉन्स्टेबल विश्राम हे राजगढच्या रैणी येथील गढीसवाईरामचे रहिवाशी आहेत. त्यामुळे, इयत्ता ८ वी पर्यंत त्यांच्या मुलांनी गावच्या शाळेतच शिक्षण घेतले. त्यानंतर, अलवर शहरातील न्यू मोनालिसा शाळेत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर, १२ वी परीक्षेची तयारी केल्यानंतर १ वर्षे कोचिंग क्लासद्वारे अभ्यास केला होता. दोन-तीन वर्षानंतर त्यांना नीट परीक्षेत यश आलं आहे. दररोज १० ते १२ तास अभ्यास करुन त्यांनी हे यश मिळवले आहे. विशेष म्हणजे ते सोशल मीडियापासून दूरच राहिले होते. केवळ अभ्यासासाठीच मोबाईलचा वापर केला, असे मुलांच्या वडिलांनी सांगितले.