अर्जुन की गोविंद? कोणता मेघवाल मारेल बाजी? एकाच समुदायातील उमेदवारांमुळे चुरशीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 09:58 AM2024-03-14T09:58:51+5:302024-03-14T09:59:42+5:30

काँग्रेस उमेदवार असलेल्या गोविंद राम मेघवाल यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

arjun or govinda which meghwal will bet tough fight due to candidates from same community in rajasthan for lok sabha election 2024 | अर्जुन की गोविंद? कोणता मेघवाल मारेल बाजी? एकाच समुदायातील उमेदवारांमुळे चुरशीची लढत

अर्जुन की गोविंद? कोणता मेघवाल मारेल बाजी? एकाच समुदायातील उमेदवारांमुळे चुरशीची लढत

बिकानेर : लोकसभा निवडणुकीत देशातील प्रमुख मतदारसंघांपैकी एक असलेल्या बिकानेरकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. यंदा काँग्रेसकडून माजी मंत्री गोविंद राम मेघवाल, तर भाजपकडून केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना रिंगणात आहेत. अर्जुन राम मेघावल हे यापूर्वी तीनवेळा विजयी झाले होते. काँग्रेस उमेदवार असलेल्या गोविंद राम मेघवाल यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता.

बिकानेर मतदारसंघात अनुपगड, खाजुवाला, बिकानेर पश्चिम, बिकानेर पूर्व, कोलायत, लुंकरानसार, डुंगरगड आणि नोखा या आठ विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जाती (SC) साठी राखीव आहे. इथे भाजप आणि काँग्रेस हे प्रमुख पक्ष आहेत. अर्जुन राम मेघवाल आणि गोविंद राम मेघवाल हे दोघेही एकाच समुदायातून येतात. त्यामुळे निवडणूक अटीतटीची होऊन मतांची विभागणी होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांनी राजकारणाची सुरुवात भाजपमधूनच केली.

पश्चिम राजस्थानातील मोठे नेतृत्व

गोविंद राम मेघवाल हे  विद्यार्थी दशेपासूनच राजकारणात सक्रिय आहेत. गोविंद मेघवाल यांनी २००३ मध्ये भाजपच्या तिकिटावर पहिली विधानसभा निवडणूक जिंकली. २००८ मध्ये त्यांना तिकीट न मिळाल्याने भाजपचा राजीनामा दिला व अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यात त्यांचा पराभव झाला. पुढे २०१८ मध्ये ते काँग्रेसमध्ये दाखल होत विजयी झाले, परंतु २०२३च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, काँग्रेसने त्यांच्यावर पुन्हा विश्वास व्यक्त केला आहे. ‘आक्रमक राजकारणा’साठी ते ओळखले जातात. मास्टर भंवरलाल यांच्या निधनानंतर गोविंद मेघवाल हे पश्चिम राजस्थानमधील काँग्रेसचे मोठे एससी नेते मानले जातात. 

आयएएस ते केंद्रीय मंत्री

अर्जुन राम मेघवाल यांनी आयएएसची नोकरी सोडून राजकारणात प्रवेश केला. जवळपास दोन दशकांपासून ते राजकारणात आहेत. त्यांनी तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळविला आहे. भाजपने त्यांना पुन्हा संधी दिल्याने ते चौथ्यांदा खासदार होण्याच्या मार्गावर आहे.  दोन्ही उमेदवार एकाच समाजातील असल्याने लोकसभा निवडणुकीत अर्जुन मेघवाल यांच्यासाठी चुरशीची लढत होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कारण, मतांची विभागणी होऊ शकते.
 

Web Title: arjun or govinda which meghwal will bet tough fight due to candidates from same community in rajasthan for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.