बाबा बालकनाथ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर? सोशल मीडियाद्वारे दिले मोठे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 13:07 IST2023-12-09T13:03:05+5:302023-12-09T13:07:07+5:30
शनिवारी बाबा बालकनाथ यांनी सोशल मीडियावर स्वत:हून एक ट्विट करत आपण राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत दिले आहेत.

बाबा बालकनाथ मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून बाहेर? सोशल मीडियाद्वारे दिले मोठे संकेत
राजस्थान विधानसभेतील दणदणीत विजयानंतर भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सध्या चर्चा सुरू आहे. भाजप कोणाला मुख्यमंत्री बनवणार, यावर अद्याप सस्पेन्स आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत बाबा बालकनाथ यांचे नाव समोर येत आहे. बाबा बालकनाथ यांना राजस्थानचे योगी देखील म्हटले जाते. मात्र, शनिवारी बाबा बालकनाथ यांनी सोशल मीडियावर स्वत:हून एक ट्विट करत आपण राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे संकेत दिले आहेत.
"पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच खासदार आणि आमदार होऊन देशसेवा करण्याची संधी जनतेने दिली. निवडणूक निकाल आल्यानंतर मीडिया आणि सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांकडे दुर्लक्ष करा. मला अजूनही पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली अनुभव घ्यायचा आहे", असे ट्विट एक्सवर करत बाबा बालकनाथ यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्याचे समजते.
पार्टी व प्रधानमंत्री @narendramodi जी के नेतृत्व में जनता-जनार्धन ने पहली बार सांसद व विधायक बना कर राष्ट्रसेवा का अवसर दिया।चुनाव परिणाम आने के बाद से मीडिया व सोशल मीडिया पर चल रही चर्चाओं को नज़र अंदाज़ करें।मुझे अभी प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में अनुभव प्राप्त करना है।
— Yogi Balaknath (@MahantBalaknath) December 9, 2023
बाबा बालकनाथ २०१९ मध्ये भाजपच्या तिकीटावर अलवर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. मात्र, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपने तिजारा मतदारसंघातून तिकीट दिले होते. या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार इम्रान खान यांचा पराभव करून विजय मिळवला आहे. या विजयानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला असून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत त्यांचे नाव चर्चेत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ज्या नाथ संप्रदायाचे आहेत, त्याच नाथ संप्रदायाचे साधू बाबा बालकनाथ आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या नावावरून सस्पेंस
राजस्थानमध्येही मुख्यमंत्र्यांच्या नावावरून सस्पेंस आहे. बाबा बालकनाथ यांच्यासह दिया कुमारी यांचेही नाव चर्चेत आहे. याशिवाय, वसुंधरा राजे या राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. कारण त्या राजस्थान भाजपचा मोठा चेहरा आहेत. तसेच, वसुंधरा राजे राजस्थानच्या दोन वेळा मुख्यमंत्री राहिल्या आहेत. याशिवाय, निवडून आलेल्या भाजप आमदारांमध्ये वसुंधरा राजे यांच्या समर्थकांची संख्या चांगली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे वसुंधरा राजे यांचा मुख्यमंत्रीपदाचा दावाही बळकट झाला आहे.