Bhajan Lal Sharma : कोण आहेत भजनलाल शर्मा? पहिल्यांदाच आमदार अन् थेट राजस्थानचे नवे मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 05:01 PM2023-12-12T17:01:16+5:302023-12-12T17:02:16+5:30
Bhajan Lal Sharma : मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधरा राजे यांना बाजूला करून भाजपने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.
जयपूर : मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर आता राजस्थानच्या मुख्यमंत्र्याचे नावही भाजपकडून मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधरा राजे यांना बाजूला करून भाजपाने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. आता ५६ वर्षीय भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असतील. ते सांगानेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते भाजपाचे प्रदेश सरचिटणीस असून भरतपूरचे रहिवासी आहेत. निवडणुकीदरम्यान भजनलाल शर्मा हे मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप झाला. तरीही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले.
विधानसभा निवडणुकीत भजनलाल शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८०८१ मतांनी पराभव केला होता. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपा आणि आरएसएसमध्ये दीर्घकाळ काम केले. भजनलाल शर्मा हे ब्राह्मण समाजातील आहेत. राजस्थानमधील लोकसंख्येपैकी सुमारे ७ टक्के लोक ब्राह्मण आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे भजनलाल शर्मा यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
#WATCH | BJP names Bhajanlal Sharma as the new Chief Minister of Rajasthan pic.twitter.com/j3awHnmH7k
— ANI (@ANI) December 12, 2023
भजनलाल शर्मा यांच्याविषयी थोडक्यात....
- प्रदेश सरचिटणीस या पदावर पक्ष संघटनेत काम.
- आमदार म्हणून पहिल्यांदाच निवड .
- सांगानेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार.
- भजनलाल शर्मा यांचा सांगानेर मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला.
- तत्कालीन आमदार अशोक लाहोटी यांचं तिकीट कापून भजनलाल शर्मा यांना संधी.
- भजनलाल शर्मा यांना तिकीट दिलं त्याविरोधात लाहोटी समर्थकांनी भाजप मुख्यालयात आंदोलन केलं होतं.
दिया कुमार आणि प्रेमचंद्र बैरवा उपमुख्यमंत्रीपदी
यासोबतच राज्यात दोन उपमुख्यमंत्री असतील. दिया कुमार आणि प्रेमचंद्र बैरवा यांची उपमुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे. तसेच, वासुदेव देवनानी राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष असतील.