‘बिपोरजॉय’चा राजस्थानात कहर, ४ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 05:55 AM2023-06-19T05:55:39+5:302023-06-19T05:56:22+5:30
गुजरात सीमेजवळ नर्मदेचा एक कालवा फुटल्यामुळे अनेक भागांत पाणी शिरले आहे.
जयपूर : चक्रीवादळ ‘बिपोरजॉय’मुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे राजस्थानमधील तीन जिल्ह्यांमध्ये, विशेषत: जालोर, सिरोही आणि बाडमेरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात विविध घटनांमध्ये दोन लहान मुलांसह ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गुजरात सीमेजवळ नर्मदेचा एक कालवा फुटल्यामुळे अनेक भागांत पाणी शिरले आहे.
सांचौर शहराला याचा सर्वाधिक धोका निर्माण झाला आहे. बाडमेर जिल्ह्यात तलावात बुडून दाेन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला, तर राजसमंदजवळ दरड काेसळल्यामुळे तरुण मरण पावला. याच जिल्ह्यात एका महिलेचा घराचे छत काेसळल्यामुळे मृत्यू झाला. बाडमेर, अजमेर, सिराेही, बांसवाडा, उदयपूर, काेटा, जाेधपूर यासह अनेक शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पिंडवाडा, अबू रोड आणि रेवारमधील अनेक मोठी धरणे पाण्याने भरली आहेत. उत्तर गुजरातमध्ये जोरदार पाऊस ‘बिपोरजॉय’ कमकुवत झाले असले तरी गेल्या २४ तासांत उत्तर गुजरातच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. अधिकाऱ्यांनी बनासकांठा आणि पाटण जिल्ह्यांतील हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.