भाजपच्या २ डझन आमदारांनी घेतली वसुंधरा राजेंची भेट! राजकीय वर्तुळात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 11:23 AM2023-12-05T11:23:26+5:302023-12-05T11:24:15+5:30
सोमवारी सुमारे दोन डझन भाजप आमदार वसुंधरा राजे यांना भेटण्यासाठी राजधानी जयपूरमधील निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
जयपूर : राजस्थानमधील भावी मुख्यमंत्र्यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू झाली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदासाठी वसुंधरा राजे यांच्यासह दिया कुमारी, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांचीही दावेदारी आहे. दरम्यान, सोमवारी सुमारे दोन डझन भाजप आमदार वसुंधरा राजे यांना भेटण्यासाठी राजधानी जयपूरमधील निवासस्थानी पोहोचले. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र, वसुंधरा राजेंची भेट घेतलेल्या सर्व आमदारांनी ही सामान्य भेट असल्याचे सांगितले आहे.
वसुंधरा राजे यांना भेटलेल्या आमदारांमध्ये कालीचरण सराफ मालवीय नगर, बाबूसिंग राठौर शेरगढ, प्रेमचंद बैरवा दुडू, गोविंद रामपुरिया मनोहरथना, ललित मीना किशनगंज, कंवरलाल मीना अंता, राधेश्याम बैरवा बरन, कलूलाल मीना डग, केकेराम बिश्नोई गुढामालानी, विक्रम बंशीवाल सिकराय यांचा समावेश आहे. याशिवाय, भागचंद बांदीकुई, रामस्वरूप लांबा नसीराबाद, प्रतापसिंह सिंघवी छाबरा, गोपीचंद मीना जहाजपूर, बहादूरसिंह कोळी वैर, शंकरसिंह रावत बेवार, मंजू बागमार जयल, विजयसिंह चौधरी नावां, सामाराम गरसिया पिंडवारा, रामसहाय वर्मा निवाई, पुष्पेन्द्र सिंह राणावत बाली आणि शत्रुघ्न गौतम केकरी यांचा समावेश आहे.
दरम्यान, वसुंधरा राजे यांची भेट घेणाऱ्या या आमदारांमध्ये प्रतापसिंह सिंघवी, कालीचरण सराफ आणि पुष्पेंद्र सिंह हे यापूर्वी वसुंधरा राजे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. प्रताप सिंह सुरुवातीपासूनच वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी वकिली करत आहेत. वसुंधारा राजे गटाच्या या आमदारांच्या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, वसुंधरा राजेंना भेटलेल्या बहुतांश आमदारांनी ही सामान्य बैठक असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्याबाबत चर्चा टाळल्याचे दिसून आले.
दुसरीकडे, भाजपचे प्रदेश प्रभारी अरुण सिंह आणि प्रदेशाध्यक्ष हेही सोमवारी रात्री उशिरा जयपूरला पोहोचले आहेत. भाजपच्या विजयानंतर ते दिल्लीला गेले होते. दिल्लीत त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोष यांची भेट घेतली. तसेच, दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात झालेल्या भाजप संसदीय मंडळाच्या बैठकीत भावी मुख्यमंत्र्यांच्या नावावर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. तसेच, जातीय समीकरणाच्या दृष्टीने राजस्थानमध्ये दोन उपमुख्यमंत्री केले जाऊ शकतात. त्यापैकी एक अनुसूचित जाती किंवा मागासवर्गीय असू शकतो.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कोण-कोण?
विशेष म्हणजे, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत आणि अर्जुन राम मेघवाल यांच्यासह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचा विचार केला जात आहे. तसेच, नवनिर्वाचित आमदार बाबा बालकनाथ, दिया कुमारी, प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्यासह अनेकांची नावेही या शर्यतीत सामील असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान वसुंधरा राजे आणि त्यांच्या गटातील आमदारांबाबत विविध प्रकारचे अंदाज बांधले जात आहेत.