राजस्थानमध्येही आणा डबल इंजिन सरकार, एकनाथ शिंदेंची सभा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 06:06 AM2023-11-24T06:06:58+5:302023-11-24T06:07:32+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मतदारांना आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
जयपूर : महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्येही डबल इंजिन सरकार आणण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील मतदारांना केले. या निवडणुकीत मतदार भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना कौल देऊन राजस्थानमध्ये नक्की परिवर्तन घडवतील, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा प्रचार रंगात आलेला असताना गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजस्थानमध्ये जाऊन भाजपच्या उमेदवारांचा प्रचार केला. सकाळी जयपूर विमानतळावर दाखल होताच त्यांचे पारंपरिक राजस्थानी पद्धतीने पगडी घालून स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी सगळ्यात आधी जयपूरच्या हवा महल परिसरातून निवडणुकीला उभे असलेले योगी श्री बालमुकुंद आचार्य यांच्यासाठी प्रचारफेरी काढली. राजस्थान ही महाशूरवीर महाराणा प्रताप यांची पुण्यभूमी असून, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातून आलो आहे, असे सांगताना त्यांनी देशासह राज्याला प्रगतीपथावर न्यायचे असेल तर केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे एकाच पक्षाचे आणि विचारांचे सरकार असणे गरजेचे असते. महाराष्ट्रात डबल इंजिनचे सरकार अस्तित्वात आल्याने देशात सर्वाधिक विकास प्रकल्प हे महाराष्ट्रात सुरू आहेत. त्यांनी शहापुरातील भाजप उमेदवार उपेन यादव. कोठपुतलीतील उमेदवार हंसराज पटेल यांच्यासाठी प्रचारसभा घेतल्या.
राजेंद्र सिंह गुढा यांची मैत्रीपूर्ण लढत
झुंझुनू जिल्ह्यातील उदयपूरवाटी विधानसभा मतदार संघातील शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेले राजेंद्र सिंह गुढा हेदेखील या निवडणुकीत नक्की विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. या मतदार संघातील लढत ही मैत्रीपूर्ण असून, तिथे कोणताही निकाल लागला तरीही एनडीएचे हात बळकट करण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम राहील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. गुढा यांच्या प्रचारासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना सचिव कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी प्रचार केला असल्याचे त्यांनी सांगितले.