अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 07:43 PM2024-11-27T19:43:39+5:302024-11-27T19:49:40+5:30
महत्वाचे म्हणजे, संघटनेचे संस्थापक राजवर्धन सिंह परमार यांनी, अजमेर दर्गा हे एक शिव मंदिर होते, ज्याला दर्गा बनवण्यात आले, असा दावा केला होता...
राजस्थानातील अजमेर येथील प्रसिद्ध दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा करणारी याचिका कनिष्ठ न्यायालयाने स्वीकारली आहे. तसेच, न्यायालयाने सर्व पक्षकारांना नोटीस बजावली असून 5 डिसेंबर ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे. हिंदू सेनेचे विष्णु गुप्ता यांनी अजमेरमधील ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा हिंदूंचे पूजा स्थळ असल्याचे म्हणत ही याचिका दाखल केली आहे.
या याचिकेवर बुधवारी अजमेर पश्चिम दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग मनमोहन चंदेल यांच्या न्यायालयाने सुनावणी केली. दरम्यान, फिर्यादी विष्णू गुप्ता यांच्या दाव्याची दखल घेत न्यायाधीश मनमोहन चंदेल यांनी दर्गा समिती, अल्पसंख्याक व्यवहार आणि एएसआय यांना समन्स नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आणि पुढील सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.
दर्गा हिंदू मंदिर असल्याचा हिंदू संघटनांचा दावा -
हिंदू संघटना दीर्घकाळापासून अजमेर दर्गा हा हिंदूंचे मंदिर असल्याचा दावा करत आहेत. 2022 मध्ये महाराणा प्रताप सेना या हिंदू संघटनेने हे हिंदू मंदिर असल्याचा दावा करत तत्कालीन राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि केंद्र सरकारला पत्र पाठवून याची चौकशी करण्याची मागणी केली होती. महराणा प्रताप सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक फोटोही पाठवला होता. ज्यात अजमेर दर्ग्याच्या खिडक्यांवर स्वस्तिक असल्याचा दावाही करण्यात आला होता.
महत्वाचे म्हणजे, संघटनेचे संस्थापक राजवर्धन सिंह परमार यांनी, अजमेर दर्गा हे एक शिव मंदिर होते, ज्याला दर्गा बनवण्यात आले, असा दावा केला होता.