“लोकसभेसाठी भाजपा पूर्णपणे तयार, राजस्थानातील सर्व २५ जागा जिंकू”; भजनलाल शर्मांना विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 11:01 AM2024-03-18T11:01:21+5:302024-03-18T11:03:09+5:30
Rajasthan Lok Sabha Elections 2024: सलग तिसऱ्यांदा भाजपा केंद्रात प्रचंड बहुमताने सरकार स्थापन करेल, असे भजनलाल शर्मा यांनी म्हटले आहे.
Rajasthan Lok Sabha Elections 2024: आगामी लोकसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी १९ एप्रिल ते १ जून या काळात सात टप्प्यांमध्ये मतदानाचा महामहोत्सव पार पडणार आहे. या निवडणुकीचा निकाल ०४ जून रोजी लागणार आहे. राजस्थानात १९ एप्रिल आणि २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी राजस्थानात सर्व जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना भजनलाल शर्मा म्हणाले की, भाजपाचा कार्यकर्ता वर्षाचे ३६५ दिवस, महिन्याचे ३० दिवस आणि दिवसाचे २४ तास काम करणारा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजस्थान भाजपा तयार आहे. राजस्थानातील जनतेने गेल्या दहा वर्षांत यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा उल्लेखनीय आणि यशाने भरलेला कार्यकाळ पाहिला आहे. राजस्थानमधील डबल इंजिन सरकारचा गेल्या तीन महिन्यांतील कारभारही पाहिला आहे. आगामी काळात भाजपा सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने केंद्रात सरकार स्थापन करेल, असे भजनलाल शर्मांनी सांगितले.
देशभरात प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन होईल
भाजपा राजस्थानमधील २५ पैकी २५ जागा जिंकेल. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांपेक्षा मोठ्या मताधिक्याने जिंकेल. देशभरात प्रचंड बहुमताने आपले सरकार स्थापन होईल. आमच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारच्या विकास आणि गरीब कल्याण योजनांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे, असे शर्मा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर पुढील आठवड्यात भाजपा आणि काँग्रेस राजस्थानच्या सर्व जागांवर उमेदवार जाहीर करू शकतात, असा कयास आहे. काँग्रेस २० मार्च रोजी दुसरी यादी जाहीर करू शकते. उर्वरित जागांसाठी १८ किंवा १९ मार्च रोजी काँग्रेस सीईसीची बैठक होऊ शकते. भाजप २२ मार्चपर्यंत सर्व उमेदवारांची घोषणा करू शकते. २० मार्चला भाजपाची बैठक होण्याची शक्यता आहे.