'तुम्हाला राजस्थानमध्ये जागा नाही'; CM पदाच्या चर्चेत असणाऱ्या बालकनाथ यांचा Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2023 08:33 AM2023-12-05T08:33:01+5:302023-12-05T08:40:11+5:30
सध्या योगी बालकनाथ यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहेत.
राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असलेल्या नावांमध्ये योगी बालकनाथ यांच्या नावाचीही चर्चा आहे. सध्या योगी बालकनाथ यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या व्हायरल होत आहेत. तिजारा विधानसभा मतदारसंघातून ६,१७३ मतांनी विजयी झालेल्या बालकनाथ यांचे त्यांच्या समर्थकांनी राजस्थानचे दुसरे योगी म्हणून वर्णन केले आहे.
सध्या योगी बालकनाथ यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये योगी बालकनाथ एका कार्यक्रमादरम्यान चोर आणि बदमाशांना इशारा देत आहेत. त्या व्हिडीओमध्ये योगी बालकनाथ म्हणत आहेत, 'जे लोक आज राजस्थानमध्ये खुलेआम गोळीबार करत आहेत, गुंडगिरी करत आहेत त्यांना योगी बालकनाथ यांनी इशारा दिला आहे.
कान उघडून ऐका...बंगाल किंवा कर्नाटकचे रेशनकार्ड वेळेवर बनवून घ्या, तुम्हाला आता राजस्थानमध्ये जागा नाही. तुम्हाला राजस्थानमध्ये लपायला जागा मिळणार नाही, आम्ही प्रत्येकाला शोधून त्याच्या कृत्याची शिक्षा देऊ, असं योगी बालकनाथ व्हिडिओमध्ये बोलताना दिसत आहे.
मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत योगी बालकनाथ का पुढे आहेत?
योगी बालकनाथ यादव समाजातील आहेत. राजस्थानमध्ये ओबीसी असल्याने ते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत इतर चेहऱ्यांपेक्षा पुढे आहेत. बालकनाथ यादव असल्याने उत्तर प्रदेश-बिहार तसेच हरियाणाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपासाठी फायदेशीर ठरू शकते. भाजपाच्या फायरब्रँड नेत्यांपैकी एक असलेले बालकनाथ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासारखे कपडे घालतात. त्यामुळे लोक त्यांना राजस्थानचे योगी म्हणतात.
वसुंधरा राजेंनी जेवणाचे केले आयोजन
राजस्थानमध्ये १९९ जागांवर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने ११५ जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेसला केवळ ६९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राजस्थानमध्ये स्पष्ट जनादेश मिळाल्यानंतर आता भाजपामध्ये मुख्यमंत्रीपदावरून मंथन सुरू झाले आहे. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर अवघ्या एक दिवसानंतर राजस्थानमधील भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी आमदारांसाठी डिनरचे आयोजन केले होते, त्याचाही राजकीय अर्थ काढला जात आहे.