कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात, दिगंबर जैन मुनींचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 07:54 PM2023-05-27T19:54:21+5:302023-05-27T19:55:57+5:30
बपावर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम मीण यांनी सांगितले की, बारा-झालावाड मेगा हायवेवर दुपारी जवळपास ३.३० वाजता जोरदार धमाका झाल्याचा आवाज आला
राजस्थानच्या कोटा जिल्ह्यातील बपावर क्षेत्र परिसरात भीषण अपघाताची घटना घडली. या दुर्घटनेत दिगंबर जैन संत अरहर सागर यांचे दुर्दैवी निधन झाले. चांदखेडी येथून ते दतियासाठी जात असताना हा अपघात झाला. झालावाड बारा मेगा हायवेवर त्यांच्या कारचे टायर फुटल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेत गाडीचा चालक भुरालाल आणि एक महिलाही गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
बपावर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी पुरुषोत्तम मीण यांनी सांगितले की, बारा-झालावाड मेगा हायवेवर दुपारी जवळपास ३.३० वाजता जोरदार धमाका झाल्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी, एक चारचाकी गाडी पलटी झाली असून शेतात पडल्याचे दिसून आले. कारचा टायर फुटून हा भीषण अपघात झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले. या कारमधून दिंगबर जैन संत अरहंत सागर महाराज हे प्रवास करत होते. ६८ वर्षीय अरहंत सागर महाराज यांचे या अपघातात जागीच निधन झाले. तर, ड्रायव्हर भुरालाल (२७) आणि महिला उषा जैन (६०) हे जखमी झाले होते. त्या दोघांना जवळील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मृत्युमुखी पडलेले संत अरहंत सागर महाराज मूळत: इंदौरचे निवासी असून त्यांचं नाव रमेश चंद्र जैन असे होते. मात्र, त्यांनी कौटुंबिक जीवनाचा त्याग करुन दीक्षा घेतली होती. त्यानंतर, मध्य प्रदेशच्या दतिया जिल्ह्यातील सोनगीर जैन मंदिरात ते वास्तव्य करु लागले. या मंदिरातील संत सुमित सागर महाराज यांचे ते शिष्य बनले. त्यांनी रमेश चंद्र यांचे नाव अरहंत सागर महाराज असे ठेवले होते.
दरम्यान, या अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक जैन मंदिर ट्रस्टशी जोडलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर, पोलीस प्रशासनाला लेखीस्वरुपात निवेदन दिल्यानंतर अरहंत सागर महाराज यांचा मृतदेह शवविच्छेदनाशिवाय ताब्यात घेण्यात आला. व तिथून मृतदेह सोनगीर येथील निवासी मंदिराकडे नेण्यात आला.