नाराज की लोकसभेत दिलेले वचन? राजस्थानच्या मंत्र्याचा राजीनामा, भाजपला पोटनिवडणुकीतही बसणार फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2024 11:45 AM2024-07-04T11:45:37+5:302024-07-04T11:46:07+5:30

लोकसभा निवडणुकीत राजस्थान पुर्वेच्या सातपैकी एकही सीट भाजपा हरली तर राजीनामा देण्याची घोषणा मीणा यांनी केली होती. यापैकी चार जागा भाजपा हरली होती.

Displeased with the promise made in the Lok Sabha? Rajasthan minister's Kirodilal Meena resignation, BJP will suffer in the by-elections as well | नाराज की लोकसभेत दिलेले वचन? राजस्थानच्या मंत्र्याचा राजीनामा, भाजपला पोटनिवडणुकीतही बसणार फटका

नाराज की लोकसभेत दिलेले वचन? राजस्थानच्या मंत्र्याचा राजीनामा, भाजपला पोटनिवडणुकीतही बसणार फटका

राजस्थान सरकारमध्ये कृषी मंत्री असलेले किरोडीलाल मीणा यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत राजस्थान पुर्वेच्या सातपैकी एकही सीट भाजपा हरली तर राजीनामा देण्याची घोषणा मीणा यांनी केली होती. यापैकी चार जागा भाजपा हरली होती, यामुळे विरोधी पक्ष काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली होती. 

मीणा यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याकडे १० दिवसांपूर्वीच राजीनामा सोपविला होता. याची घोषणा त्यांनी आज केली आहे. ज्या सातपैकी चार जागा भाजपा हरली त्या दौसा, करौली-धौलपूर, टोंक-सवाई माधवपूर आणि भरतपूर या आहेत. लोकसभा निवडणुकीची हार हे फक्त एक निमित्त आहे. खरेतर कृषी मंत्रालयाकडून कृषी विपणन आणि ग्रामीण विकास मंत्रालयातून पंचायत राज हे वगळून मीणा यांना मंत्री बनविण्यात आले होते. यामुळे ते पहिल्या दिवसापासून नाराज होते. 

याचबरोबर दौसामधून त्यांनी त्यांचा भाऊ जगमोहन मीणा यांच्यासाठी तिकीट मागितले होते. परंतू पक्षाने कन्हैयालाल मीणा यांना तिकीट दिले होते. यामुळेही ते नाराज झाले होते. मीणा हे सवाईमाधवपूर येथून आमदार आहेत. तिथेही भाजपाचा पराभव झाला होता. 

किरोडीलाल मीणा यांच्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पारंपारिक मीणा आदिवासी मते भाजपकडे गेली होती. परंतु मीणांकडे भाजपाने दुर्लक्ष केल्याने मीणा यांनी ही मते काँग्रेसकडे फिरविली. पूर्व राजस्थानमध्ये डॉ. किरोडीलाल मीणा यांचे वर्चस्व आहे. दौसा आणि देवली-उनियारा या जागांवर विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीतही मीणा यांची नाराजी भाजपाला भोवण्याची चिन्हे आहेत. 

मीणा हे मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही अनुपस्थित होते. राजीनामा दिल्यानंतर मीणा यांना दिल्लीत बोलविण्यात आले होते. परंतू मुख्यमंत्र्यांसोबत संबंध ताणले गेल्याने पुढची चर्चा थांबली होती. अखेर आज मीणा यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीला का गेला नाही, या प्रश्नावर मी राजीनामा दिल्याने गेलो नाही असे उत्तर दिले आहे. तसेच नाराजी नाही तर लोकसभेत दिलेल्या वचनामुळे मी राजीनामा दिल्याचे ते म्हणाले. 

Web Title: Displeased with the promise made in the Lok Sabha? Rajasthan minister's Kirodilal Meena resignation, BJP will suffer in the by-elections as well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.