राजस्थानमध्ये वसुंधरा राजे यांची भाजपत उपेक्षा? ओमप्रकाश माथूरही बैठकांपासून दूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 06:41 AM2024-03-21T06:41:47+5:302024-03-21T06:42:36+5:30
Lok Sabha Election 2024: राजस्थानमधील भाजपचे आमदार व माजी कॅबिनेट मंत्री श्रीचंद कृपलानी यांना गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर कोणीही बसायला खुर्चीही दिली नाही.
- जितेंद्र प्रधान
जयपूर : राजस्थान भाजपच्या राजकारणात माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व ओमप्रकाश माथूर या दोन नेत्यांना सध्या पक्षाने बाजूला सारले आहे किंवा हे दोन नेतेच पक्षकार्यात फारसे सक्रिय नाहीत, असे म्हटले जाते. गेल्यावर्षीच्या राजस्थानच्या विधानसभा निवडणुकांनंतर मुख्यमंत्रिपदी कोणाला निवडायचे, याबाबतच्या निर्णय प्रक्रियेत वसुंधरा राजेंचा सहभाग नव्हता. त्यांच्याशी निष्ठावंत असलेल्यांची भाजप नेतृत्वाकडून उपेक्षा केली जात असल्याची भावना आहे.
प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकांमध्ये नेहमी उपस्थित राहाणारे ओमप्रकाश माथूर गेल्या काही दिवसांपासून या बैठकांमध्ये सहभागी झालेले दिसले नाहीत. तसेच वसुंधरा राजेदेखील कोअर कमिटीच्या बैठका तसेच भाजपच्या संघटनात्मक बैठकांपासून दूर असल्याचे चित्र आहे.
या नेत्यांनाही आला उपेक्षेचा अनुभव
राजस्थानमधील भाजपचे आमदार व माजी कॅबिनेट मंत्री श्रीचंद कृपलानी यांना गेल्या मंगळवारी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या कार्यक्रमात व्यासपीठावर कोणीही बसायला खुर्चीही दिली नाही. सरतेशेवटी ते भाजप कार्यकर्त्यांमध्ये जाऊन बसले. राहुल कासवान यांना भाजपने लोकसभा निवडणुकीत तिकीट न दिल्याने पक्षत्याग करून ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. राजस्थान विधानसभा निवडणुकीत वसुंधरा राजे यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार घोषित न केल्याने भाजप नेतृत्वावर त्या पक्षाचे प्रल्हाद गुंजाल यांनी टीका केली होती. त्यांनाही भाजप नेतृत्वाने बाजूला सारले असल्याची चर्चा आहे.