भाजपाने जे मोदींबाबत केलं, तोच प्रयोग मोदींनी राजस्थानात केला; अजब 'योग' जुळून आला!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 09:00 AM2023-12-13T09:00:22+5:302023-12-13T09:47:09+5:30
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली.
मुंबई - मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केल्यानंतर आता राजस्थानच्या मुख्यमंत्र्याचे नावही भाजपकडून मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. पहिल्यांदाच आमदार झालेल्या भजनलाल शर्मा यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या प्रबळ दावेदार असलेल्या वसुंधरा राजे यांना बाजूला करून भाजपाने अनपेक्षितपणे भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे भजनलाल शर्मा यांनी पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक जिंकली अन् ते थेट मुख्यमंत्री बनले. त्यामुळे, त्यांनी विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बरोबरी साधली आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते राजनाथ सिंह यांनी भजनलाल शर्मा यांच्या नावाची घोषणा केली. आता ५६ वर्षीय भजनलाल शर्मा हे राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निकटवर्तीय आणि पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले भजनलाल शर्मा यांची थेट राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा यांची उपमुख्यमंत्रिपदी आणि वासुदेव देवनानी यांची विधानसभा अध्यक्ष म्हणून निवड झाली.
भजनलाल शर्मा हे पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले आणि थेट मुख्यमंत्री झाले. त्यामुळे, त्यांनी नरेंद्र मोदींशी बरोबरी साधली आहे. कारण, गुजरातमध्ये नरेंद्र मोदींनाही भाजपाने अशीच संधी दिली होती. नरेंद्र मोदींनी गुजरात विधानसभेसाठी पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यावेळी, त्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नरेंद्र मोदींनी २००१ मध्ये विधानसभेची पोटनिवडणूक जिंकली आणि ७ ऑक्टोबर २००१ मध्येच मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली होती. मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले आणि नंतर आमदार, पण पहिल्याच आमदारकीत त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली होती.
त्यानंतर, ८ २००१ ते २२ मे २०१४ पर्यंत त्यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर, २०१४ मध्ये ते पहिल्यांदाच खासदार झाले आणि थेट पंतप्रधानपदी विराजमान झाले. पहिल्यांदाच आमदार होऊन मुख्यमंत्री आणि पहिल्यांदाच खासदार होऊन पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी हे एकमेव नेते आहेत.
आता भजनलाल शर्मा यांनीही पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक जिंकली आणि ते मुख्यमंत्री बनले आहेत. त्यामुळे, त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते नरेंद्र मोदींसोबत बरोबरी साधली आहे. दरम्यान, अलिकडे म्हणजेच २०१४ नंतर दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेही पहिल्यांदाच आमदार होऊन मुख्यमंत्री झाले आहेत.
मतदारसंघाबाहेरील उमेदवार
भजनलाल शर्मा हे भाजपाचे प्रदेश सरचिटणीस असून भरतपूरचे रहिवासी आहेत. निवडणुकीदरम्यान भजनलाल शर्मा हे मतदारसंघाबाहेरचे असल्याचा आरोप झाला. तरीही सांगानेरच्या जनतेने त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी केले. शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र भारद्वाज यांचा ४८०८१ मतांनी पराभव केला. विद्यमान आमदार अशोक लाहोटी यांचे तिकीट कापून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी भाजपा आणि आरएसएसमध्ये दीर्घकाळ काम केले. शर्मा हे ब्राह्मण समाजातील आहेत. राजस्थानमधील लोकसंख्येपैकी सुमारे ७ टक्के लोक ब्राह्मण आहेत. दरम्यान, मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यामुळे भजनलाल शर्मा यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे.
मध्य प्रदेशात ७ वेळा आमदार असलेले मोहन यादव मुख्यमंत्री
मोहन यादव १९९० मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २००३ मध्ये ते पुन्हा आमदार झाल्यावर त्यांना राज्यमंत्री करण्यात आले. तर २००८ मध्ये आमदार झाल्यावर त्यांना परिवहन मंत्री पद देण्यात आले होते. मोहन यादव आतापर्यंत ७ वेळा आमदार झाले आहेत. ते सध्या उज्जैन दक्षिण मतदारसंघाचे आमदार असून या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत.