शारजाला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशाला आला हृदयविकाराचा झटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 08:45 AM2023-08-21T08:45:06+5:302023-08-21T08:45:36+5:30
विमानाच्या क्रू मेंबरने लगेच जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाला माहिती दिली आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली.
जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरइंडिगोच्याविमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. इंडिगोचे हे विमान उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथून उड्डाण केल्यानंतर शारजाला जात होते. विमान उड्डाण करत असताना विमानातील क्रू मेंबरला एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. विमानाच्या क्रू मेंबरने लगेच जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाला माहिती दिली आणि इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. त्यानंतर जयपूर विमानतळ एटीसीच्या अधिकाऱ्यांची तात्काळ शारजाहला जाणाऱ्या या विमानाला इमर्जन्सी लँडिंगची परवानगी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगोच्या विमानाने (फ्लाइट क्रमांक 6E-1423) उत्तर प्रदेशची राजधानी लखनौहून रविवारी रात्री 9.45 वाजता शारजाहला उड्डाण केले होते. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला हृदयविकाराचा झटका आला. यासंबंधी माहिती क्रू मेंबरने लगेच जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिली. तसेच, इमर्जन्सी लँडिंगची परवानगी मागितली. यानंतर परवानगी मिळताच इंडिगोचे विमान जयपूर विमानतळावर उतरवण्यात आले. यानंतर प्रवाशाला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याआधी मे महिन्यातही जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर चार विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. दिल्लीतील खराब हवामानामुळे विमानांचे जयपूर विमानतळावर लँडिंग करावे लागले होते. इंदूरहून दिल्लीला येणारे इंडिगो 6E-2174 विना जयपूर विमानतळाकडे डायव्हर्ट करण्यात आले होते. याशिवाय राजकोट-दिल्ली आणि झारसुगुडा-दिल्ली विमानेही जयपूर विमानतळावर उतरवण्यात आली होती. इमर्जन्सी लँडिंगपूर्वी जयपूर विमानतळ अधिकाऱ्यांनी यासंबंधी माहिती देण्यात आली होती, जेणेकरून विमानांच्या आपत्कालीन लँडिंगसाठी विमानतळ तयार ठेवले जाईल.
... तर तुम्ही विमानाचे तिकीट बुक करू शकता
दरम्यान, सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. रक्षाबंधनाचा सण जवळ येत आहे. या दिवशी सार्वजनिक वाहतुकीवर सर्वाधिक भार असतो. राजस्थानमध्ये या दिवशी सर्वाधिक प्रवासी रोडवेज बसमधून प्रवास करतात. यावेळी रस्त्यांची अवस्था बिकट असून रेल्वेतही पुरेशी व्यवस्था नसल्याने यंदा रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी भाडेवाढ केलेली नाही. 28 ऑगस्टपर्यंत, राखीच्या एक दिवस आधी, सर्व विमान कंपन्या फक्त नियमित भाडे आकारत आहेत. जर तुम्हालाही रक्षाबंधनाच्या दिवशी राज्याबाहेर जायचे असेल आणि तुम्हाला रेल्वेमध्ये रिझर्व्हेशन मिळत नसेल तर तुम्ही विमानाचे तिकीट बुक करू शकता.