कैद्याच्या पोटात सापडला मोबाईल, रुग्णालयात दाखल केल्यानंतर समोर आला धक्कादायक खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 08:17 PM2024-01-09T20:17:38+5:302024-01-09T20:18:28+5:30
मोबाईल त्याच्या पोटात कसा पोहोचला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जयपूर : राजस्थानमधील जयपूर येथील सर्वात मोठ्या एसएमएस रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सवाई मानसिंग रुग्णालयात डॉक्टरांना एका रुग्णाच्या पोटाची तपासणी करताना मोबाईल सापडला. हा मोबाईल की पॅड असलेला होता. त्यानंतर डॉक्टरांनी प्रक्रियेद्वारे रुग्णाच्या पोटातून मोबाईल बाहेर काढला. हा रुग्ण अंडरट्रायल होता. मोबाईल त्याच्या पोटात कसा पोहोचला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राज्यातील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या एसएमएसच्या डॉक्टरांच्या नावावर अत्यंत क्लिष्ट शस्त्रक्रिया करण्याच्या अनेक नोंदी आहेत. परंतु काहीवेळा डॉक्टरांसमोर अशी प्रकरणे समोर येतात की सर्वांनाच आश्चर्य वाटते. अशाच एका विचित्र प्रकरणात एसएमएस रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून मोबाईल काढला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या रुग्णाच्या पोटातून मोबाईल काढण्यात आला तो जयपूर तुरुंगात होता.
मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच कारागृहातील एका अंडरट्रायल कैद्याला शुक्रवारी एसएमएस रुग्णालयामध्ये आणण्यात आले होते. त्यानंतर शस्त्रक्रिया विभागाच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली. तपासात रुग्णाच्या पोटात मोबाईल असल्याचे समोर आले. त्यानंतर आज शस्त्रक्रिया विभागातील डॉक्टर शालू गुप्ता यांनी एन्डोस्कोपीद्वारे तोंडातून मोबाईल बाहेर काढला.
सध्या कैद्याची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. मात्र, मोबाईल फोन कैद्याच्या पोटात कसा गेला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र मोबाईल फोन कैद्याने गिळला असावा, असा अंदाज आहे. साधारणपणे कारागृहात मोबाईल तपासले जातात. अशा परिस्थितीत कैदी अनेकदा मोबाईल लपवण्यासाठी अशा प्रकारे प्रयत्न करतात. जयपूर तुरुंग प्रशासनाकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
असाच एक प्रकार जोधपूरमध्येही समोर आला होता
दरम्यान, याआधीही जोधपूर मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने गुदद्वारात मोबाईल लपवण्याचा प्रयत्न केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. नंतर मोबाईलवर ऑपरेशन करून बाहेर काढण्यात आले. त्यातही कैद्याकडे मोबाईल कोठून आला याबाबत तुरुंग प्रशासनाने मौन बाळगले होते.