गोगामेडी हत्याप्रकरण: UAPA अंतर्गत गुन्हा दाखल; FIR मध्ये अशोक गेहलोत यांचंही नाव
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 08:02 AM2023-12-07T08:02:39+5:302023-12-07T08:04:12+5:30
गोगामेडी हत्याप्रकरणातील आरोपी अद्यापही मोकळा श्वास घेत आहेत
जयपूर - श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने राजस्थानात खळबळ उडाली आहे. सुखदेव सिंह गोगामेडी हे आपल्या निवासस्थानी असताना तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी गोगामेडी यांच्यासोबत चर्चा करत असतानाच त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षाव केला. या हल्ल्यात गोगामेडी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या हत्येचे राजस्थानात पडसाद उमटत असून राज्यव्यापी बंदही पुकारण्यात आला होता. अशातच आता राजस्थान पोलिसांचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आणणारी माहिती समोर येत आहे. तर, याप्रकरणी दाखल एफआयआरमध्ये डीजीपी आणि माजी मुख्यमंत्र्यांचेही नाव घेण्यात आलं आहे.
गोगामेडी हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी अद्यापही मोकळा श्वास घेत आहेत. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली असून युएपीएअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दाखल एफआयआरमध्ये राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि डीजीपी यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. सुरक्षा पुरविण्यासाठी निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल या दोन दिग्गजांची नावे एफआयआरमध्ये घेण्यात आली आहेत. गोगामडीच्या पत्नीने यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे.
गोगामेडी यांच्या सुरक्षेसंदर्भात २४ फेब्रुवारी, १ मार्च आणि २५ मार्च रोजी राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पोलीस महासंचालक यांना पत्र लिहिण्यात आले होते. मात्र, जाणीवपूर्वक त्यांना सुरक्षा पुरवण्यात आली नाही. शीला शेखावत यांनी फिर्यादीमध्ये हे नमूद केले आहे. विशेष म्हणजे १४ फेब्रुवारी २०२३ रोजी पंजाब पोलिसांनी राजस्थानच्या डीजीपींना पत्र लिहून सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या हत्येचा कट रचण्यात येत असल्याची पूर्वकल्पना दिली होती. त्यानंतर, १४ मार्च रोजी एटीएस जयपूरनेही इंटेलिजन्सच्या एडीजीपींना याची माहिती दिली होती. मात्र, एवढ सगळे इन्पुट मिळाल्यानंतरही जाणूनबुझून माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि डीजीपीसह जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गेगामेडी यांना सुरक्षा पुरवली नाही, असे त्यांच्या पत्नीने एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
युएपीए काय आहे?
दरम्यान, सुखदेव सिंह गोगामेडी यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या दोन आरोपींची ओळख पटली आहे. रोहित राठोड असे एका आरोपीचे नाव असून तो नागौरमधील मकराना येथील रहिवासी आहे. तसंच या प्रकरणातील दुसरा आरोपी नितीन फौजी हा हरियाणातील महेंद्रगडचा रहिवासी आहे. मात्र, दहशतवादी रोहित गोदरा याने या घटनेची जबाबदारी घेतली आहे. तसेच, या घटनेत संपत नेहरा आणि गँगस्टर लॉरेंस बिश्नोई याचेही नाव समोर आसलं आहे. याप्रकरणी विदेशी दहशतवाद्यांची मोठी साखळी आहे, त्यानुसार तपास व्हावा, अशी मागणी शीला शेखावत यांनी केली आहे. त्यामुळे, दहशतवादी विरोधी कायदा म्हणजे युएपीएअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.