प्यार तूने क्या किया! प्रेयसीच्या नातेवाईकांची प्रियकराला बेदम मारहाण; लुटले 3 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 01:33 PM2023-05-09T13:33:07+5:302023-05-09T13:34:01+5:30
तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या घरात घुसून तीन लाखांचा ऐवज लंपास केला.
राजस्थानमधील कोटाच्या बुंदी जिल्ह्यातील दबलाना पोलीस स्टेशन हद्दीतील गोठडा गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रेमप्रकरणाच्या घटनेत प्रेयसीच्या नातेवाईकांनी प्रियकरावर हल्ला करून त्याला जखमी केले. तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्या घरात घुसून तीन लाखांचा ऐवज लंपास केला. घटनेनंतर जखमी प्रियकराच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी कोटा येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुलीच्या कुटुंबातील चार जणांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
जखमी तरुणाचा भाऊ खेमराज याने दिलेल्या माहितीनुसार, त्याचा लहान भाऊ लेखराज सैनी याचे समाजातील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करारही झाला होता. असं असतानाही सोमवारी मुलीचे नातेवाईक शस्त्रांसह घरी आले. युवराज, राकेश, रामहेत आणि रामचरित या चौघांनी तरुणाच्या घरात घुसून लेखराज सैनीवर हल्ला करून जखमी केले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेनंतर तेथून निघून जात असताना आरोपींनी आत्याकडून घरात ठेवलेले 3 लाख रुपये काढून घेतले. या संदर्भात प्रेयसीच्या नातेवाईकांच्या वतीने दबलाना पोलीस ठाण्यात तक्रार देऊन आरोपींवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. जखमींनी दिलेल्या जबाबानंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे ते सांगतात. तपासात जे तथ्य समोर येईल त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.
बुंदीमध्ये अशीच एक घटना घडली होती. एका प्रेयसीच्या नातेवाईकांनी प्रियकराला बेदम मारहाण केली होती. बुंदीच्या कृषी मंडई रोडवर प्रियकर आणि प्रेयसी एकांतात बोलत होते. याच दरम्यान, मुलीचे नातेवाईक तेथे पोहोचले आणि त्यांनी तरुणाला शेतात नेऊन बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणाच्या डोक्याचे केसही कापण्यात आले. तरुणाचा आरडाओरडा ऐकून तेथे पोहोचलेल्या लोकांनी त्याला वाचवले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.