राजस्थान मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, जयपूरमध्ये बांधले जाणारे पहिले जेम बोर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 01:23 AM2023-08-31T01:23:01+5:302023-08-31T06:33:19+5:30
ॲनिमल वेल्फेअर बोर्डाला अमृता देवी स्टेट ॲनिमल वेल्फेअर बोर्ड, असे नाव देण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
जयपूर : मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राजस्थान मंत्रिमंडळाची मंगळवारी बैठक झाली, यात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये राजस्थान अर्धवेळ कंत्राटी नियुक्ती नियम-२०२३ ला मान्यता, जयपूरमध्ये जेम बोर्सची स्थापना आणि विविध संस्थांना जमिनीचे वाटप, असे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यासोबतच ॲनिमल वेल्फेअर बोर्डाला अमृता देवी स्टेट ॲनिमल वेल्फेअर बोर्ड, असे नाव देण्याचाही मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
आता अर्धवेळ कामगारांना ३ लाख रुपयांपर्यंतचा लाभ
मंत्रिमंडळाने राजस्थान अर्धवेळ कंत्राटी नियुक्ती नियम-२०२३ च्या मसुद्याला मंजुरी दिली आहे. यामध्ये अर्धवेळ कामगारांना त्यांची सेवा संपल्यावर २ ते ३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य पॅकेज मिळेल. हे लाभ विभागांमध्ये काम करणाऱ्या अर्धवेळ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती, मृत्यू आणि सेवानिवृत्तीनंतर दिले जातील. हे नियम तयार झाल्यानंतर अर्धवेळ कामगारांच्या भरतीमध्ये पारदर्शकता येणार असून, त्यांना आर्थिक पाठबळही मिळणार आहे. उल्लेखनीय म्हणजे २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, स्वयंपाकी यांसारख्या अर्धवेळ काम करणाऱ्या मानधन कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीवर आर्थिक साहाय्य देण्याच्या उद्देशाने राजस्थान अर्धवेळ कंत्राटी नियुक्ती नियम-२०२३ जाहीर केले होते.
जयपूरमध्ये राज्याचा पहिला जेम बोर्स बांधणार : ६० हजार लोकांना मिळणार रोजगार
जयपूरमधील जेम बोर्सची स्थापना आणि विकासासाठी आरक्षित दराने सुमारे ४४ हजार चौरस मीटर जमीन उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. ही जमीन जयपूर जेम अँड ज्वेलरी बोर्ड (एसपीव्ही)ला ९९ वर्षांच्या लीजवर औद्योगिक राखीव दराच्या तिप्पट दराने जेम बोर्ड स्थापन करण्यासाठी दिली जाईल. त्यामुळे रत्नांच्या निर्यातीला चालना मिळेल. सुमारे ६० हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. याचा राज्याच्या आर्थिक विकासावर आणि प्रगतीवर सकारात्मक परिणाम होईल.
प्राणी कल्याण मंडळाचे नाव आता अमृता देवी राज्य प्राणी कल्याण मंडळ
राज्य प्राणी कल्याण मंडळाचे नाव आता ‘अमृता देवी राज्य प्राणी कल्याण मंडळ’ असे असेल. अमृता विष्णोई यांनी प्राणी आणि जंगलांच्या रक्षणासाठी केलेले बलिदान आणि सजीवांप्रती समर्पण व्यक्त करण्यासाठी मंडळाच्या नावात बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यातून सामान्य माणसाला पशू-पक्ष्यांच्या कल्याणासाठी प्रेरणा मिळेल.
ज्वेलर्समध्ये आनंदाची लाट- डेरेवाला
ज्वेलर्सची जुनी मागणी पूर्ण झाल्याने मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आनंदाची लाट उसळली. सरकारच्या निर्णयाचे कौतुक करताना जेम बोर्सचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल डेरेवाला म्हणाले की, या निर्णयामुळे जयपूरच्या ज्वेलरी उद्योगाला जगात नवी उंची मिळेल. बांधकामासाठी १,२०० ते १,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार आहे. जयपूरच्या व्यावसायिकांशिवाय देशातील आणि जगातील व्यावसायिकांची कार्यालये येथे उघडतील. त्यामुळे येथे साठ हजार लोकांना रोजगाराची संधी मिळणार आहे. कलर जेम स्टोन, प्रिशियस जेम स्टोनसह ज्वेलरी व्यवसाय एकाच छताखाली करता येतो. जयपूरचा दागिन्यांचा व्यवसाय देशात आणि जगात आणखी वाढेल.