ना पासपोर्ट ना व्हिसा; पाकिस्तानी तरुणी जयपूर विमानतळावर ताब्यात, IB करणार चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2023 07:22 PM2023-07-28T19:22:02+5:302023-07-28T19:23:38+5:30
Jaipur News: तीन वर्षांपासून भारतात राहणाऱ्या पाकिस्तानी तरुणाला जयपूर विमानतळावरुन ताब्यात घेण्यात आले आहे.
जयपूर: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून भारतात आलेल्या आणि भारतातून पाकिस्तानात गेलेल्या दोन महिलांची जोरदार चर्चा सुरू आहे. यातच आता जयपूरविमानतळावर पाकिस्तानातील एका तरुणीला रोखण्यात आले आहे. सध्या ही तरुणी पोलिसांच्या ताब्यात असून, तिची चौकशी सुरू आहे. तिच्यासोबत 2 मुलंही जयपूर विमानतळावर आले होते.
मुलीला घेऊन आलेल्या मुलांचे म्हणणे आहे की, मुलीने त्यांना विमानतळाचा पत्ता विचारला होता. यानंतर दोघेही तिला सोडण्यासाठी विमानतळावर आले. मुलीची भाषा पाकिस्तानी वाटत आहे. तसेच, मुलीकडे व्हिसा आणि पासपोर्टही नाही. सध्या विमानतळ पोलिस ठाण्यात तरुणीची चौकशी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही तरुणी गेल्या 3 वर्षांपासून भारतात राहत आहे. ती सीकरमध्ये मावशीकडे राहते, मावशीसोबत भांडण झाल्यावर पाकिस्तानला जाण्यासाठी विमानतळावर पोहोचली. तिच्याकडे ना पैसे आहेत ना व्हिसा किंवा पासपोर्ट. या तरुणीला पाकिस्तानला जाणाऱ्या विमानाची कोणतीही माहिती नव्हती. यादरम्यान ती तरुणी दोन तरुणांच्या संपर्कात आली, त्यानंतर त्यांनी तिला विमानतळावर सोडले.
पाकिस्तानचे तिकीट काढण्यासाठी तरुणी विमानतळावर पोहोचली होती. आता विमानतळ पोलीस स्टेशन तिच्या भारतात 3 वर्षांच्या वास्तव्याचे रेकॉर्ड तपासत आहे. गजल असे या मुलीचे नाव असून तिचे वय सुमारे 17 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ती पाकिस्तानातील लाहोर येथील असल्याचे तरुणीचे म्हणणे आहे.
सीकरमधील श्रीमाधोपूर येथून बसमध्ये बसून ती जयपूरला आली. बसमधील 2 तरुणांशी ओळख झाली आणि त्यांनी तिला जयपूर विमानतळावर सोडले. पासपोर्टशिवाय प्रवेश करत असताना सीआयएसएफने तरुणीला रोखले. आता विमानतळ पोलीस ठाण्यात तरुणीची चौकशी सुरू आहे. पाकिस्तानी गझलची चौकशी करण्यासाठी आयबीचे पथकही विमानतळ पोलीस ठाण्यात पोहोचले आहे.