पोलिस भरतीत अग्निवीरांना प्राधान्य; राजस्थान, अरुणाचल प्रदेश सरकारची महत्त्वपूर्ण घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 05:29 AM2024-07-28T05:29:31+5:302024-07-28T05:30:45+5:30
आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर त्वरित अग्निपथ योजना रद्द करू, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले.
जयपूर : राजस्थान सरकारने कारागृह तसेच वनखात्यातील रक्षक, राज्य पोलिसांच्या भरतीत माजी अग्निवीरांना राखीव जागा ठेवण्याची घोषणा मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी केली. पण, या जागांचे प्रमाण किती असेल ते त्यांनी जाहीर केले नाही. तर अरुणाचल प्रदेशमधील पोलिस, अग्निशमन दलाच्या भरतीत माजी अग्निवीरांना प्राधान्य देण्याचा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे.
राज्य पोलिस, आपत्कालीन संकट निवारण व अग्निशमन दल, अरुणाचल प्रदेश बटालियन्समधील भरतीमध्ये माजी अग्निवीरांना प्राधान्य देण्यात येईल, असे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी म्हटले आहे.
सत्तेवर आल्यानंतर अग्निपथ योजना रद्द करू : अखिलेश यादव
आम्ही केंद्रात सत्तेवर आल्यानंतर त्वरित अग्निपथ योजना रद्द करू, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले. यूपीमध्ये पोलिस व प्रॉव्हिन्शिअल आर्म्ड कॉन्स्टॅब्युलरीतील (पीएसी) भरतीमध्ये माजी अग्निवीरांना प्राधान्य देण्यात येईल, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली होती. त्यावर यादव यांनी टीका केली आहे. ‘अग्निवीर’मुळे देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे, असेही ते म्हणाले.
राखीव जागांची घाेषणा
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी सांगितले की, राज्यातील पोलिस तसेच कारागृह, वनखात्यातील रक्षकांच्या भरतीत माजी अग्निवीरांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी अग्निपथ योजना उत्तम असल्याचे सांगितले. लष्कराच्या उज्ज्वल भवितव्यासाठी ही योजना उपयोगी असल्याचे ते म्हणाले. पोलिस व अन्य राज्यातील अन्य दलांमध्ये माजी अग्निवीरांना आरक्षण ठेवण्याची घोषणा मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, यूपी, उत्तराखंड, राजस्थान या राज्यांनी केली होती.